Coronavirus : भारताला ‘कोरोना’ला घाबरण्याची गरज नाही, फक्त ‘ही’ काळजी घ्या, वरिष्ठ संशोधकांनी सांगितले

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 5 लोकांपैकी 4 लोक आपोआप बरे होतात. सध्यातरी भारतातील लोकांना व्हायरसच्या पसरण्याबाबत घाबरण्याची गरज नाही. मागच्या वर्षी रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या सदस्या म्हणून निवडुण आलेल्या पहिल्या भारतीय महिला संशोधक आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या प्रॉफेसर गगनदीप कांग यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली.

प्रोफेसर कांग यांनी सांगितले की, आजाराची तपासणी ही सल्ला दिल्यानंतरच करावी. भारतात कोरोना व्हायरसचे रूग्ण वाढून 30 झाले आहेत, ज्यामध्ये 16 इटलीचे पर्यटक आहेत.

कोरोनाबाबत गगनदीप यांनी म्हटले की, यावेळी कोणतेही उपचार उपयोगी ठरत नाहीत, परंतु त्यांची मदत होत आहे. पाचपैकी चार लोक आपोआपच बरे होतात. अशा रूग्णाला खोकला आणि तापासाठी केवळ पॅरासिटामॉल सारखे औषध दिले जाते.

कांग यांनी म्हटले, पाचव्या व्यक्तीला डॉक्टरला दाखवण्याची किंवा रूग्णालयात भरती करण्याची गरज पडू शकते. जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

प्रोफेसर कांग म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. आपण दररोज अनेक प्रकारच्या व्हायरसच्या संपर्कात येत असतो. आपल्या हात स्वच्छ धुवा आणि फरशी किटाणुनाशकाने पुसून घ्या. चेहर्‍याला विनाकारण स्पर्श करू नका.

जर तुम्हाला ताप अथवा सर्दी असेल तर घरूनच काम करणे योग्य ठरेल. शिंकणार्‍या आणि खोकणार्‍या व्यक्तींपासून सुमारे 10 फूट दूर राहा.

कोरोना व्हायरस (सीओवी) हा प्रत्यक्षात विविध व्हायरसचे एक मोठे कुटुंब आहे, ज्याच्यामुळे सामान्य सर्दीपासून श्वास घेण्याचा गंभीर त्रास होऊ शकतो.

कांग म्हणाले, सध्या असे दिसून येत आहे की, फ्ल्यूच्या तुलनेत कोरोनामुळे मुलांमध्ये गंभीर स्थिती निर्माण होत नाही. या व्हायरसची ज्येष्ठ व्यक्ती किंवा रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांनी पीडित लोकांना लवकर लागण होते, हे गंभीर आहे.

महत्वाचे मुद्दे :

– जर कुणाला वाटत असेल की आपण कोरोनाच्या संपर्कात आलो आहोत, तर त्याने ताबडतोब आरोग्य अधिकार्‍यांना माहिती द्यावी.

– सध्या या आजाराशी लढण्यासाठी कोणतीही लस नाही, परंतु शोध सुरू आहे.

– जर लस तयार करण्याचे प्रयत्न योग्य मार्गाने गेले तर पुढील वर्षापर्यंत लस तयार होऊ शकते.

– जर तुम्हाला ताप किंवा सर्दी आहे तर तुम्ही घराच्या बाहेर पडू नका.

– शिकणार्‍या आणि खोकणार्‍या लोकांपासून सुमारे 10 फूट अंतरावर राहा.

– नमूने घेतल्यानंतर व्हायरसच्या संसर्गाचा अहवाल येण्यास सुमारे 12-24 तास लागू शकतात.

– जगभरात 90 हजारपेक्षा लोकांना याची लागण झाली आहे, यापैकी तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण ठरत असलेला कोरोना यापूर्वी कधीही आढळला नव्हता.