भारत-चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये महत्वाची बैठक !

पोलिसनामा ऑनलाईन – सीमावादावर तोडगा काढण्यासाठी आज भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे. मागच्या महिन्याभरापासून पुर्व लडाखमध्ये तणााव असून दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. एकाच बैठकीतून लगेच तोडगा निघणार नाही याची दोन्ही देशांना कल्पना आहे. पण सकारात्मक चर्चा सुरु झाल्यास तणाव निवळण्यास मदत होईल. सध्या दोन्ही देशांनी लडाखमध्ये मोठया प्रमाणावर सैन्य तैनात केले असून युद्धसाहित्य सुद्धा सज्ज ठेवले आहे.

आज होणार्‍या महत्वाच्या बैठकीआधी शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये सचिव स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. यावेळी मतभेदाचे पर्यावसन वादामध्ये न करता चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. चीनच्या ताब्यातील मोल्डो हट येथे ही बैठक होणार आहे. 14 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. चीनकडून मेजर जनरल लिऊ लिन या बैठकीत सहभागी होतील. हरिंदर सिंग यांच्या तुलनेत लिऊ लिन कनिष्ठ रँकिंगचे अधिकारी आहेत. पण लडाखमधील नियंत्रण रेषेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पँगॉग टीएसओ तलावाच्या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या वादावादीनंतर महिन्याभराने ही बैठक होत आहे. भारत आणि चीनची नियंत्रण रेषा या तलावाजवळून जाते. या ठिकाणी सीमा हद्दीवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहेत. नियंत्रण रेषेवर संघर्षाची स्थिती असलेल्या एका भागामध्ये दोन्ही देशांचे सैनिक थोडे मागे हटले आहेत. गालवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्य दोन किलोमीटर तर भारतीय सैनिक एक किलोमीटर मागे हटले आहेत.