महासत्ता कोणीही असो, भारतच ‘कोरोना’ लशीचा KING !

पोलीसनामा ऑनलाइन : आज सकाळचा हा फोटो म्हणजे कोरोना लशीवर भारताच्या बादशाहीचा दर्शक आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणास जरी पहिल्यांदा सुरुवात झालेली असली तरीही जगभराच्या नजरा या भारताकडे लागलेल्या आहेत. कोरोनाच्या अंधारात भारत या देशांना आशेचा किरण दाखवत आहे. याचे एक मोठे कारण आहे. खरेतर कोरोना लशीची परडी ही भारताच्या हातात असून, ती हैदराबादमध्ये आहे. जगभरातील 64 देशांचे प्रतिनिधी बुधवारी (दि. 9) हैदराबादमध्ये (64-envoys-visit-bharat-biotech-hyderabad ) आहेत.

सध्या देशात गुजरात, पुणे आणि हैदराबाद आदी तीन ठिकाणी कोरोना लसी अंतिम टप्प्यात आहेत. तसेच फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने कोरोना लशीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केले आहेत. या लशींमुळे आज जगाच्या नजरा भारताकडे आशेने पाहत आहेत. हे एक मोठे यश म्हणावे लागेल. या लशींसाठी जगभरातील 64 देशांचे प्रतिनिधी हैदराबादमधील भारत बायोटेक व बायोलॉजिकल ईच्या दौऱ्यावर आहेत.

 

भारत बायोटेक स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनवर काम करत आहे, तर हैदराबादची आणखी एक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड (बीई) ने जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लशीचे उत्पादन वाढविण्यासाठी जॉन्सन फार्मास्युटिका एनव्हीसोबत करार केला आहे. या लशीचे उत्पादन भारतातही मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. जगभरातील देशांना कमी दरात चांगल्या लशीची प्रतीक्षा आहे. यासाठी त्यांनी भारताकडे कूच केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने महिनाभरापूर्वी 190 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना कोरोना-19 लसीबाबत माहिती दिली होती. यानुसार पहिल्यांदा या 64 देशांच्या प्रतिनिधींना हैदराबादला नेले जात आहे. यानंतर गुजरात, पुण्यातही नेले जाणार आहे. दरम्यान फायझर, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकने दिलेल्या आपत्कालीन अर्जांवर आज मोठी बैठक होणार आहे.