Coronavirus : ‘कोरोना’ला हरविण्यासाठी भिवंडीतील आदिवासी कुटुंब 5 दिवस उपाशी

पोलिसनामा ऑनलाईन टीम –  देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कारखाने, गोडाऊन तसेच सर्व रोजगार बंद झाले आहेत. अनेक कुटुंब जे रोजंदारीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्यावर असलेल्या गरीब कुटुंबांना रोजगार नसल्याने मागील पाच दिवसापासून फक्त पाणी आणि कंदमुळे खाऊन जगावे लागत आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी हे कुटुंब मागील पाच दिवसांपासून घरातच आहे. मात्र काहीही झाले तरी चालेल पण कोरोनाला हरवणार हा त्यांचा निश्चय दृढ आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून लोकांनी गर्दी टाळावी, घरातच राहावे, बाहेर फिरु नये, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले आहे. त्यासाठी भिवंडी तालुक्यातील भिणार येथील आदिवासी पाड्याच्या हेंगाडे कुटुंब मागील पाच दिवसांपासून फक्त पाणी पीत उपाशी पोटी राहून कोरोनाला हरवण्यासाठी घरातच थांबून आहे.

काम करुन 100 ते 200 रुपये मिळायचे. त्यावर आमचं पोट चालत होते. मात्र कोरोनामुळे सर्व काम बंद झाले आहे. त्यामुळे जेवणाचे खूप हाल होत आहेत. मुले जेवणामध्ये भात, चपाती मागतात पण पैसे नसल्याने ते शक्य नाही. त्यामुळे पाणी पिऊन उपाशीपोटीच झोपावे लागत आहे. रस्त्यावर जे थोडे थोडे तांदूळ पडलेले असतात ते वेचून आणले आहे. त्याचा भात बनवू परंतु काहीही झाले तरी चालेल पण कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही घरातच राहणार. परिस्थिती एवढी बिकट असूनही जर हे कुटुंब घरात थांबू शकत तर इतर लोक का घरात थांबू शकत नाही, असा प्रश्न आहे. घराबाहेर विनाकारण मोकाट फिरणार्‍यांसाठी हेंगाडे कुटुंबाचे उदाहरण आहे.