भारताची ‘नवलाई’ ; एकाच सामन्यात रचले ९ विक्रम 

ऑकलंड : वृत्तसंस्था – भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर सात विकेट्स राखून दमदार विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात फक्त विजयश्री खेचुन आणली नाही तर तब्बल ९ विक्रमांना गवसणी घातली आहे.

भारताने केलेल्या विक्रमांची यादी

१. भारताचा न्यूझीलंडमधील हा पहिला टी-२० विजय आहे. २००९पासून भारताला यापूर्वी एकदाही विजय मिळवता आला नव्हता.

२. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. रोहितच्या नावावर २२८८ धावा असून त्याने गप्टीलला (२२७२) पिछाडीवर टाकले आहे.

३. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक लगावणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात चार षटकार लगावत त्याने आतापर्यंत एकूण १०२ षटकार लगावले आहेत.

४. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार लगावण्याचा मानही रोहितने पटकावला आहे. आतापर्यंत एकाही भारताच्या खेळाडूला शंभर षटकार लगावता आलेले नाहीत.

५. रोहित हा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके लगावणारा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या नावावर २० अर्धशतकांपेक्षा जास्त खेळी आहेत. रोहितने यावेळी विराट कोहलीला (१९) पिछाडीवर टाकले आहे.

६. कृणाल पंड्याने या सामन्यात तीन बळी मिळवत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडमधील टी-२० सामन्यांमध्ये तीन बळी मिळवणारा कृणाल हा पहिला गोलंदाज ठरला आहे.

७. कर्णधार म्हणून रोहितने सर्वात जास्त टी-२० सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कोहलीने यापूर्वी १२ टी-२० सामने जिंकले आहेत आणि आता रोहितने त्याच्याशी बरोबरी केली आहे.

८. भारताकडून टी-२० सामन्यांत सर्वाधिक झेल पकडण्याच्या यादीत रोहितने (३३) दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये पहिला क्रमांक सुरेश रैनाचा (४२) आहे.

९. रोहित आणि शिखर धवन यांनी या सामन्यांत ७९ धावांची सलामी दिली. टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतकी सलामी देण्याच्या यादीमध्ये संयुक्तरीत्या अव्वल स्थान पटकावले आहे.

दरम्यान, या नऊ विक्रमांच्या नवलाईत रोहित शर्माने आपले वेगळे स्थान कायम ठेवले आहे. रोहितने आपले हिटमॅन नाव पुन्हा एकदा सार्थ केले आहे.