भारतातून ‘या’ 3 देशांत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा मागील काही महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाचा विषाणूचा संसर्गामुळे भारतातून परदेशात होणारी विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं सुरु करण्यासंदर्भात भारताकडून बोलणी सुरु झाली आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मध्यपूर्वेकडील विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात चर्चा पुढील टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती भारताच्या एअरपोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष अरविंद सिंग यांनी दिली. भारतातील परदेशातील विमानसेवा बंद करून 1 जुलै रोजी 100 दिवस झाले. आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याविषयची चर्चा अखेरच्या टप्प्यात आली आहे. पण भारतातही प्रत्येक राज्यात सध्या क्वारंटाईन आणि इतर नियम वेगवेगळे असल्याने बाहेरचे देश आणि देशांतर्गत राज्य या दोन्ही बाजूंनी चर्चा होणे अपेक्षित आहे.

अरविंद सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरीका, कॅनडा आणि यूएई यांच्याशी चर्चा पुढच्या टप्प्यात पोहचली आहे. कदाचीत याच महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत सुरु होईल. मागील आठवड्यामध्ये युरोपीय महासंघाचे आंतरराष्ट्रीय प्रवासाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. काही देशांतून विमानसेवेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या परवानगी मिळालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही. ही यादी दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा नव्याने तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अरविंद सिंग यांनी सांगितले की, देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांकडून विमानसेवा सुरळीत करण्याविषयी सतत मागणी होत आहे. ते सध्या ज्या देशात रहात आहेत, त्यांच्याकडूनही अशी परवानगी मिळणं त्यासाठी अत्यावश्यक आहे. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात असल्याचे सिंग यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, काही देशांच्या मते, भारतीय विमानतळांवर कोविड-19 च्या नियमांपेक्षा जास्त गर्दी असते. त्यामुळे त्यांनी भारतात विमान सेवा सुरु करण्याची अद्याप तयारी दर्शवलेली नाही. त्यामुळे कदाचित ठराविक शहरांतून विमानसेवा सुरु करण्याविषयी चाचपणी सुरु आहे.