केवळ चीनसोबत तणावच नव्हे तर मोदी सरकारपुढं आहेत ‘ही’ 5 मोठी आव्हानं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीनमधील तणाव आता खूप वाढला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० सैनिक शहीद झाल्यानंतर राजकारणही तापले आहे. नवी दिल्ली ते बीजिंग पर्यंत बैठका सुरू आहेत. युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनीही जगातील अव्वल दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पण भारताची चिंता ही फक्त चीनबरोबरचा तणाव नाही, तर पाच आव्हाने देखील आहेत.

एकीकडे चीनकडून येणारा तणाव आता प्रचंड वाढलेला दिसत असून दुसरीकडे चीनकडून आलेल्या कोरोना व्हायरसने त्रस्त आहे. शतकानुशतके मित्र असलेला नेपाळही वैर दाखवत आहे, तर दहशतीचा जनक पाकिस्तान सीमेवर सतत गोळीबार करत आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था एक वेगळीच डोकेदुखी वाढवत आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार या आव्हानांना एकत्र कसे सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

चीनवर विश्वास ठेवू शकत नाही
लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोल (एलएसी) ओलांडून भारतीय सीमेत घुसलेल्या चिनी सैन्याशी असलेला गतिरोध सोडवण्यासाठी सैन्य पातळीवर बोलणी सुरू होती. काही दिवसांपूर्वीच चिनी सैन्य दोन किलोमीटर मागे हटले होते. त्यामुळे चर्चा योग्य दिशेने जात आहे असे वाटले, पण ही चीनची युक्ती आहे. त्यांचा स्वभाव फसवा आहे. चीन सीमेजवळ लष्करी सामर्थ्य वाढवत आहे आणि भारताशी चर्चेद्वारे गतिरोध दूर करण्याचे नाटक देखील करत आहे.

गतिरोध दूर करण्यासाठी सहमती असलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी भारतीय सैन्य करत होते, तेव्हाच चिनी सैनिकांनी लोखंडी रॉड व दगडांनी २० सैनिकांना शहीद केले. यामुळे सैन्य पातळीवरील चर्चेतून गतिरोध दूर करण्याच्या शक्यतेला धक्का बसला आहे, तसेच असा संदेशही मिळाला आहे कि चीन २१ व्या शतकातही बदललेला नाही. त्यांच्यावर आताही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.

जुना मित्र देखील वैर दाखवत आहे
नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध फक्त सत्ता आणि सरकारांवरच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक आधारावर देखील खूप घनिष्ट राहिले आहेत. ज्या नेपाळशी भारताचे चांगले संबंध आहेत, तो जुना मित्रही आता वैर दाखवत आहे. नेपाळची सत्ता चीनकडे झुकलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या हाती गेली, तेव्हापासून हा बदल झाला आहे.

नेपाळने संविधानात बदल करुन नवीन नकाशा जाहीर केला आहे, ज्यामध्ये भारतातील तीन ठिकाणे लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी यांना त्यांचा भाग घोषित करण्यात आला आहे. सरकारसमोर जुन्या मित्रासोबत संबंध चांगले ठेवण्यासह चीनच्या वाढत्या प्रभावाचे आव्हानही आहे.

एलओसीवर पाकिस्तानकडून अघोषित युद्ध
म्हणायला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षविराम आहे, पण लाइन ऑफ कंट्रोल (एलओसी) यावर शेजारचा देश कधी ऐकतो? वर्षातील १२ महिने सैनिकांना सीमेच्या रक्षणासाठी पाकिस्तानशी अघोषित युद्ध लढावे लागते.

पाकिस्तान कधी दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी कव्हर फायर करतो, तर कधी भारतीय सीमावर्ती गावांना नकळत लक्ष्य करतो. पाकिस्तान नेहमीच भारतासाठी एक आव्हान राहिला आहे.

कोरोना वाढवत आहे डोकेदुखी, नियंत्रण करण्याचे आव्हान
चीनपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश होत आहे, पण गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारताची डोकेदुखी थोडी अधिक वाढली आहे. देशात ६६ दिवस लॉकडाऊननंतर जेव्हा निर्बंध शिथिल केले गेले, तेव्हा कोरोना देखील अनलॉक झाला.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील चार पैकी तीन महानगरे कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट केंद्र म्हणून उदयास आली आहेत. यामध्ये आर्थिक राजधानी मुंबई आणि चेन्नईचाही समावेश आहे. देशातील कोरोना रूग्णांची संख्या ३.५ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे, तर मृतांची संख्याही १०,००० च्या आसपास आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर नियंत्रण करणे सरकारसाठी एक मोठे आव्हान असल्याचे सिद्ध होत आहे.

कोरोनामुळे खालावलेली अर्थव्यवस्था कशी येईल मार्गावर?
अर्थव्यवस्था आधीच खराब होती, परंतु कोरोना महामारीमुळे ती आणखीनच खालावली आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची गती थांबली, म्हणून उद्योग आणि व्यापारही थांबले. जसा कारखान्यांमधील मशीन्सचा आवाज नाहीसा झाला, तसे अर्थव्यवस्था वर येण्याचे प्रयत्न देखील मंदावले.

रोजगार जाण्यामुळे उत्पन्नाचे संकट निर्माण झाले, त्यामुळे स्थलांतरित कामगार त्यांच्या घराकडे जाऊ लागले. तसेच बेरोजगारीचा दरही सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजच्या घोषणेसह सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान सुरू केले आहे. पण नकारात्मक विकास दराच्या अंदाजानुसार अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे सोपे नसल्याचे दिसत आहे.