नौदलाला मिळाली स्वदेशी ताकद ! परदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करणार INS Kavaratti !

पोलीसनामा ऑनलाईनः भारतीय नौदलाला (Indian Navy)आज 90 टक्के स्वदेशी उपकरणं लावलेली खतरनाक युद्धनौका मिळाली आहे. ही युद्धनौका पानबुड्यांचा कर्दनकाळ बनणार आहे. प्रोजेक्ट-28 अंतर्गत ही युद्धनौका बनवण्यात आली आहे. लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे (Manoj Mukund Naravane)यांनी आज विशाखापट्टणममध्ये ही युद्धनौका नौदलाकडे सोपवली आहे. भारताची संरक्षण दलं आता हळूहळू स्वदेशी शस्त्रास्त्रांकडे वळू लागली आहेत.

प्रोजेक्ट-28 नुसार स्टील्थ युद्धनौका बनवण्यात आल्या आहेत. यापैकी 3 युद्धनौका या आधीच देशसेवेत आहेत. ही या श्रेणीतली चौथी युद्धनौका आहे. तिचं नाव आयएनएस कवरत्ती (INS Kavaratti) आहे. महत्त्वांचं म्हणजे ही नौका भारतीय नौदलाच्या अभियंत्यांनीच डिझाईन केली आहे. या प्रकल्पाची सुरुवात 2003 मध्ये करण्यात आली होती. INS कमोर्टा (2014), INS कदमत (2016), INS किल्टन (2017) या 3 युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आहेत.

वैशिष्ट्ये –

– युद्धनौकेवरील 90 टक्के उपकरणं ही स्वदेशी बनावटीची
– युद्धनौकेच्या बांधणीत कार्बन कंपोझिटचा वापर. हे नौदलाला मिळालेलं मोठं यश आहे.
– आयएनएस कवरत्तीचं डिझाईन हे भारतीय नौदलाच्या नौदल डिझाईन महानिदेशालय (DND) नं तयार केलं आहे.
– नौकेची बांधणी कोलकाता गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सनं केली आहे.
– आयएनएस कवरत्ती पानबुड्यांचा शोध घेणं आणि त्यांच्यावर अचूक हल्ला करण्यास सक्षम आहे. यासाठी स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि सेंसर लावण्यात आले आहेत.
– पानबुड्यांविरोधात मोहिम सुरू असतानाच स्वत:चा बचाव करणं आणि लाबं पल्ल्याच्या मोहिमांना यशस्वी पूर्ण करणं ही तिची खासियत आहे.
– कवरत्ती हे नाव एकेकाळी भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या मिसाईलनं युक्त अशा युद्धनौकेवरून ठेवण्यात आलं आहे. या नौकेनं पाकिस्तानच्या तावडीतून बांग्लादेशला सोडवण्याच्या 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

आयएनएस विक्रांतही लवकरच येणार

भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) लवकरच चाचणीनंतर हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांच्या दरम्यान तैनात केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएनएस विक्रांतची हार्बर चाचणी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर लवकरच याची बेसिनची चाचणीही सुरू केली जााईल. स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत 2023 पर्यंत नौदलात सामील होऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएनएस विक्रांतच्या हार्बर चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु कोरोनाच्या संकटामुळं मात्र त्याच्या बेसिन चाचण्यांना उशीर झाला आहे. बेसिन चाचण्यांमध्ये बसवलेल्या सर्व उपकरणांची चाचणी केली जाते व जहाज समुद्रात उतरण्यास सक्षम आहे की नाही याचा अभ्यास केला जातो. भारतीय नौदलानं विशाखापट्टणममध्ये आयएनएस विक्रांत तैनात करू इच्छित असल्याचं सांगितलं आहे.