‘मोदींनी बंगाल निवडणूक संपताच टागोरांच्या भूमिकेतून रुझवेल्टच्या भूमिकेत जावं’, संजय राऊतांचा ‘रोखठोक’ मधून निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा कसाबसा बाहेर येत असतानाच दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. शेअर बाजारात दररोज याचे परिणाम दिसून येत आहेत. देशात निर्माण झालेल्या स्थितीवर भाष्य करताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष रुझवेल्ट यांनी घेतलेल्या निर्णयांकडे बोट दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. तसेच देशाला आज एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवे असल्याचे त्यांनी आपल्या ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे. तसेच किमान पंतप्रधान मोदी यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्ट यांच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचे आहे, असा खोचक टोला लगावला आहे.

देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावरील उपचारांसाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिव्हीर या औषधांचाही तुटवडा भासत आहे. तसेच, कोरोनाचा पुन्हा वाढत्या संसर्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसतोय. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सध्या नवा मनमोहन सिंग निर्माण होण्याची गरज
कोरोना संकटामुळे आपल्या देशात नाही तर जगभरात एक मंदीची लाट आली आहे. भारतासारख्या देशात उत्पादनाचा वेग घटला आहे. लोकांनी नोटाबंदीच्या काळात नोकऱ्या गमावल्याच होत्या. आता लॉकडाऊनमध्ये उरलेल्या लोकांनीही नोकऱ्या गमावल्या, असे सांगत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करुन त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे आवश्यक असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.

‘हम बनिया लोग है’
पंतप्रधान मोदी हे एक राजकीय व्यक्तीमत्व आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक चांगले अर्थतज्ज्ञ त्यांना सोडून गेले आहेत. गुजरात हा व्यापाऱ्यांचा प्रदेश आहे. ‘हम बनिया लोग है’ असे ते लोक अभिमानाने सांगतात. मोदी यांनीही ‘आपण व्यापारी आहोत’ असे वारंवार सांगतात, पण व्यापारीच दुकान थंडा करुन बसेलत, असं देखील राऊत यांनी म्हटले.

स्मशाने, कब्रस्ताने 24 तास सुरु आहेत
29 ऑक्टोबर 1929 रोजी अमेरिकेतील वायदे बाजार कोसळला आणि तेथे एक भयानक मंदीची लाट आली, पण वर्षभर अगोदर तेव्हाचे अध्यक्ष हुवर यांनी अमेरिकन काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात मात्र देशात आबादीआबाद असल्याचे म्हटले होते. तेच राजकीय वातावरण आज आपल्या देशातही आहे. इस्पितळे व राजकारण सोडले तर आपल्या देशात काहीच सुरु नाही. स्मशाने, कब्रस्तानेदेखील 24 तास सुरु आहेत. स्मशानांत लाकडांची टंचाई आहे व कब्रस्तानात जमीन कमी पडत आहे. हे आबादीआबाद असल्याचे लक्षण नाही, असे म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

देशाच्या अर्थमंत्री कुठेच दिसत नाहीत
मंदीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेस उभारणी देण्यासाठी आपण नक्की काय करत आहोत यावर देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्री काहीच बोलण्यास तयार नाहीत. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी नक्कीच हरतील, असे मोदी सांगतात. हे काही कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील ‘रेमडेसिवीर’ उपचार नाहीत. महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल, असे अमित शाह म्हणतात. हा सुद्धा मंदी व बेरोजगारीच्या प्रश्नावरचा उतारा नाही. देशाच्या अर्थमंत्री तर कुठेच दिसत नाहीत.

एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा
अमेरिकेत प्रे. रुझवेल्ट यांच्या भाषणानंतर पहिल्या तीन महिन्यांत सर्वच राष्ट्रीय बँकांनी, आर्थिक संस्थांनी जोरात उलाढाल सुरु केली. नवे सकारात्मक वातावरण निर्माण झाले. लोकांना खात्री पटली की प्रे. रुझवेल्ट यांचे सरकार हे केवळ गतिमान व पुरोगामीच नाही, तर आनंदी व आनंदवर्धक आहे. ‘जगा आणि जगू द्या’ पद्धतीचे आहे. दु:ख विसरुन कामास लागा, आनंदाची नवी क्षितिजे शोधा असे सांगणारे आहेत. लोकांनी त्याचे स्वागत केले आणि आर्थिक मंदीचे रुपांतर अर्थव्यव्यस्था गतिमान होण्यात झाले. हे मी का सांगतोय ? आपल्याला आजचे संटक दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा, असे संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे.