‘गांधी जयंती’दिनी अण्णा हजारेंचा Smart City संकल्पनेवर ‘प्रहार’ ! म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –   निसर्ग आणि मानवतेचं शोषण करून साधलेला विकास हा शाश्वत नव्हे तर केवळ फुगवटा असतो. त्यामळं स्मार्ट सिटी नव्हे तर समृद्ध खेडीच देशाला तरू शकतील. महात्मा गांधींनी हाच संदेश दिला होता. मात्र आपण तो विसरून गेलो. कोरोनानं आपल्याला पुन्हा एकदा त्याची जाणीव करून दिली आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.

गांधी जयंतीनिमित्त अण्णा हजारे यांनी तरुणांना उद्देशून एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. यात विकास आणि त्यासाठी खेडी व तरूणांचं योगदान यावर त्यांनी भाष्य केलं आहे. अण्णा हजारे म्हणतात, “महात्मा गांधींनी संदेश दिला होता की, खेड्याकडे चला. मात्र स्वातंत्र्यानंतर प्रत्येक सरकारनं खेड्यांकडं दुर्लक्ष करून शहरच वाढवली. त्यातूनच पुढं स्मार्ट सिटी संकल्पना आली. शहरीकरणाच्या नादात आपण कोट्यावधी टन इंधन जाळतो आहोत. त्यातून तापमानवाढ होऊन प्रदूषणही निर्माण झालं. आतापर्यंत न ऐकलेल्या रोगांच्या साथी येत आहेत. म्हणजे निसर्ग आणि मानवतेचं शोषण करून साधलेला विकास शाश्वत नसतो. खेड्यांमधील विकास हा तेथील साधनसामग्रीचा वापर करून साधता येतो. याचं उदाहरण आम्ही राळेगण सिद्धी गावात दाखवून दिलं आहे.”

अण्णा हजारे म्हणतात, “25 व्या वर्षी आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता. मात्र गांधीजींचे विचार वाचण्यात आले. त्यातून प्रभावित झालो आणि आत्महत्या करण्याचा विचार सोडून देऊन कामाला सुरुवात केली. आज 83 व्या वर्षी तेच विचार घेऊन पुढे जात आहे.”

पुढे बोलताना हजारे म्हणाले, “खेड्यांचं महत्त्व आता कोरोनानं आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. लोकांचे लोंढेच्या लोंढे शहरं सोडून गावाकडे धावते होते. मिळेल त्या साधनानं अन्यथना शेकडो किमीची पायपीट करत लोक गाव जवळ करत होते. सुरुवातीलाच जर याकडं लक्ष दिलं असतं तर या लोकांवर ही वेळ आली नसती. आता तरी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपला देश तरुणांचा आहे. त्यांनी यावर जरूर विचार करावा. आपलं मूळ कर्तव्य कधीही विसरू नका.”