‘MIM-वंचित’ आघाडी विधानसभेसाठी पुन्हा एकत्र ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभेच्या तोंडावर जागावाटपावरून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फुट पडली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आघाडी तुटल्याची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रीत लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एनडीटीव्ही आणि पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

वंचित आघाडीसोबत जाण्यावर पक्ष पुर्नविचार करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनीही जागांबाबत तडजोड करण्यास तयारी दर्शवली आहे. पिटीआयशी संवाद साधताना जलील म्हणाले, एमआयएम-वंचित आघाडी होणं अवघड आहे. असे मला वाटत नाही. मोठा भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावर तोडगा काढला, तर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींसोबत पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली तर आम्ही तयार असल्याचे, जलील म्हणाले.

दोन्ही पक्षामध्ये समेट घडवण्यासाठी आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा का ? या प्रश्नाला उत्तर देताना जलील म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ईमेलवरून खासदार ओवेसी यांना जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे ओवेसी निराश झाले. ओवेसी यांनी आंबेडकरांबाबत आदर आहे, त्यांनी एक फोन मला करायचा होता. त्यानंतर आपण चर्चा केली असती. पण ईमेलद्वारे जागावाटपाचा प्रस्ताव पाठवणे हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रीया ओवेसी यांनी दिल्याचे इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.

वंचित आणि एमआयएम यांच्यात पुन्हा आघाडी होण्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. लोकांना असा पर्याय नको आहे. त्यामुळे मतदार पर्याय म्हणून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडे बघत आहे. आम्ही किती जागा लढवू हे अद्याप निश्चित नसले तरी जास्तीत जास्त 60 जागा आम्ही लढू, अशी माहिती जलील यांनी दिली आहे.