16 वर्षानंतर डयूटीवर परतले ख्वाजा यूनुस हत्याकांड प्रकरणात निलंबीत झालेले 4 पोलिस

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल यांना सुमारे 16 वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आले होते, त्यांना आता पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. मुंबईतील घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी ख्वाजा युनूसची पोलिस कोठडीत झालेल्या कथित हत्येच्या संदर्भात या चौघांना निलंबित करण्यात आले होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांना देखील पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझे यांच्यासह चार पोलिसांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आले होते. युनूसचा खून आणि पुरावा मिटविणे यासह अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. 1990 च्या तुकडीतील पोलिस अधिकारी वाझे यांच्यासहित चार पोलिसांना शुक्रवारी पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई यांनी शनिवारी स्थानिक आर्म्स युनिटमध्ये काम हाती घेतले. त्याचबरोबर कॉन्स्टेबल राजाराम निकम यांना मोटार वाहन विभागात पोस्ट केले गेले आहे.

दुसरीकडे, ख्वाजा युनूस हत्येप्रकरणी निलंबित पोलिसांना पुन्हा सेवेत रुजू केल्याने सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू असिम आझमी यांनी सोमवारी पक्षाच्या कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले होते. नोव्हेंबर 2007 मध्ये सचिन वाझे यांनी पोलिस दलाचा राजीनामा दिला होता, परंतु त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित राहिल्याने राजीनामा मंजूर झाला नाही. दरम्यान 2008 मध्ये दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले.

यूनुस व्यवसायाने इंजिनिअर होता, दुबईहून परतला होता

महाराष्ट्रातील परभणी येथे राहणारा ख्वाजा युनूस (वय 27) हा व्यवसायाने इंजिनिअर होता आणि दुबईमध्ये नोकरी करत होता. डिसेंबर 2002 मध्ये घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीसाठी औरंगाबाद येथे नेताना युनूस फरार झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीआयडी तपासणीत त्याचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला असल्याचे उघडकीस आले. या तपासणीत 14 पोलिसांना दोषी ठरविण्यात आले पण खटला केवळ वाझे, तिवारी, निकम आणि देसाई यांच्यावरच चालवण्यात आला. सरकारी वकिलांच्या एका साक्षीदाराने सत्र न्यायालयात सांगितले की कोठडीत युनूसचे कपडे काढून बेल्टने त्याच्या छातीवर आणि पोटावर मारहाण केली गेली.