Coronavirus : ‘या’ 3 देशांच्या नागरिकांना सध्यातरी भारताकडून व्हिसा नाही मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने आता भारतात देखील आपले पाय पसरवले आहेत. दिल्लीनंतर आता मुंबईमध्ये देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी आता भारत सरकारने योग्य ती काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. आजमितीला भारतात ५२ रुग्ण झाली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून एक ‘ट्रॅव्हल ऍडव्हायजरी’ जारी करण्यात आली आहे. या नुसार जर्मनी, फ्रांस आणि स्पेनच्या नागरिकांना भारतातर्फे काही काळासाठी व्हिजा नाकारण्यात आला आहे. ही बंदी ११ मार्च किंवा त्यापूर्वी भारतात येणाऱ्या नागरिकांच्या व्हिजावर घातली आहे.

याआधीही भारताने अनेक देशांच्या व्हिजावर बंदी घातली होती. तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या जवळपास ७ लाखांहून अधिक प्रवाशांची चाचणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान भारताकडून चीन, साऊथ कोरिया, इटली, जपान अशा काही देशांच्या व्हिजा आणि व्हिजा ऑन अरायव्हलवर बंदी घातली आहे. तसेच विमानतळावर तपासणी देखील करण्यात येत आहे.

तसेच समोर आले की, पुण्यातील एक कुटुंब एका ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत दुबईला फिरण्यासाठी गेले होते, तर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार चालू असून त्यांच्यासमवेत असणाऱ्या मुंबईतील सहा प्रवाशांचा देखील शोध मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे. त्या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप त्यांना लागण झाली की नाही हे अजून उघडकीस आलेले नाही.