Coronavirus : ‘धोका’ वाढला ! ‘कोरोना’ तिसऱ्या ‘टप्प्यात’ ? आता वेगाने वाढू शकतो ‘गुणाकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा धोका वाढला असून तो दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात पोहचला आहे, असे कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाचे संयोजक डॉ. गिरधर ग्यानी यांनी सांगितलं आहे. कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहचला असून त्याचं सामुदायिक संक्रमण सुरु झाल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाने दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रख्यात डॉक्टरांची आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ग्यानी उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सामुदायिक संक्रमण हा महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये कोरोनाचा प्रसार अतिशय वेगात होतो. सामुदायिक संक्रमणामध्ये याचा केंद्र बिंदू शोधणे अतिशय अवघड असते. या टप्प्यात अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतात. मात्र त्यांना कोरोनाचे संक्रमण नेमके कोणाकडून झाले याचा माग काढणं अवघड असतं, अशा शब्दात ग्यानी यांनी तिसऱ्या टप्प्यात काय होऊ शकतं याची माहिती दिली.

डॉ. गिरधर ग्यानी यांनी पुढे सांगितले की, आपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आपल्या हाती खूपच कमी वेळ उरला आहे. वाढणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयं सज्ज ठेवावी लागणार आहेत. मात्र, त्यासाठीही पुरेसा वेळ शिल्लक नाही. येत्या काही आठवड्यांमध्ये कधीही रुग्णांची संख्या अचानक वाढू शकते. त्यासाठी आवश्यक रुग्णालयं आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार अद्यापही जुन्या पद्धतीचा अवलंब करत असल्याचे सांगत यामध्ये तातडीने बदल करायला हवेत असे त्यांनी सांगितले. खोकला, श्वासोच्छवासात समस्या, ताप अशी तिन्ही लक्षण आढळून येत असल्यावरच सध्या कोरोना चाचणी घेतली जाते आहे. केवळ एक लक्षण आढळून आल्यास चाचणी केली जात नाही, ही पद्धत सरकारने बदलली पाहिजे. तसेच सरकारकडे कोरोना चाचणी करणारी पुरेशी किटदेखील नसल्याची अतिमहत्त्वाची माहिती ग्यानी यांनी दिली.