भारताला मिळाला 290 कोटी रूपयांच्या शस्त्रास्त्रांचा ‘सौदा’, इंडियानं केली ‘या’ दोन देशांवर मात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने रशिया आणि पोलंडला मागे टाकत आर्मेनियाबरोबर एक मोठा संरक्षण करार करण्यात यश मिळवले आहे. या कराराच्या माध्यमातून भारत संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) द्वारे विकसित केलेले आणि इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) द्वारे निर्मित केलेले ४ कोटी डॉलर (सुमारे २९० कोटी रुपये) चे शस्त्र आर्मेनियाला विकणार आहे.

मेक इन इंडियाला यश –

सूत्रांच्या माहितीनुसार, या सौद्यामध्ये ‘स्वाति वेपन लोकेटिंग रडार’ प्रणालीचा समावेश आहे. या शस्त्रांची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी आर्मेनियाला रशिया आणि पोलंड या देशांनी देखील ऑफर केली होती. दोन्ही देशांनी या चाचणीचे आयोजन देखील केले होते, पण आर्मेनियाने भारताने बनवलेल्या प्रणालीवर विश्वास ठेवला आणि हा करार अंतिम झाला.

ही शस्त्रे पुरविली जातील –

या करारानुसार भारत चार स्वाति वेपन लोकेटिंग रडार पुरवेल, जो की ५० किमीच्या रेंज मध्ये स्वयंचलित आणि अचूक श्रेणीमध्ये मोर्टार, शेल आणि रॉकेट्ससारख्या शत्रूची शस्त्रे शोधतो. रडार एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांमधून डागलेले एकाधिक प्रक्षेपण शोधू शकतो.

भारतीय सैन्य जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर हेच रडार वापरत आहे. सैन्याला २०१८ मध्ये चाचणीसाठी ही यंत्रणा देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमुळे भारताला स्वदेशी प्रणालींच्या विक्रीसाठी नवीन बाजारपेठ खुली होईल, जी युरोपियन आणि इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत स्वस्त आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी असेही म्हटले की संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी आता दक्षिण-पूर्व आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य-पूर्व देशांकडे लक्ष लागले आहे. मोदी सरकारद्वारे २०२४-२५ पर्यंत वार्षिक ३५,००० कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.