महाराष्ट्र, केरळमध्येच नवीन 75 % कोरोना रुग्ण !

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे म्हटले जात असले तरी देशभरातील नवीन कोरोना बाधितांपैकी ७५ टक्के बाधित हे महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातच आढळून येत आहे. देशात गेल्या २४ तासात १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

आतापर्यंत देशात १ कोटी ९ लाख ७७ हजार ३८७ कोरोना बाधित झाले असून त्यापैकी १ कोटी ६ लाख ७८ हजार ४८ जण बरे झाले आहेत. सध्या देशभरात १ लाख ४३ हजार १२७ सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ५६ हजार २१२ जणांचा मृत्यु झाला आहे.

आज देशात १३ हजार ९९३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यातील १० हजार ६१७ नवीन रुग्ण हे महाराष्ट्र आणि केरळमधील आहेत.

त्यापैकी सर्वाधिक ६ हजार ११४ रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. तर केरळ मध्ये ४ हजार ५०५ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर तामिळनाडु असून तेथे दोन्ही राज्यांच्या मानाने केवळ ४४८ नवीन रुग्ण आढळून आले आहे. कर्नाटक ३८६, दिल्ली १५८, उत्तर प्रदेश १०२, पश्चिम बंगाल १९४, छत्तीसगड २५९, गुजरात २६६, मध्य प्रदेश २९७, पंजाब ३८३ नवीन रुग्ण आढळले आहेत. अन्य राज्यात दोन अंकी रुग्णवाढ झाली आहे.

 

 

 

महाराष्ट्रात दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून पूर्वी ज्या भागात कमी रुग्ण आढळून आले होते, अशा भागात नवीन कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात पूर्वी कोरोना बाधितांची संख्या अन्य विभागाच्या मानाने कमी होती. मात्र, आता मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील नागपूर,अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.