Coronavirus in India : देशभरात मागील 24 तासांत 15 हजार 968 नवे कोरोनाबाधित, 202 रुग्णांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सद्यस्थितीस देशात २ लाख १४ हजार ५०७ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, १ कोटी १ लाख २९ हजार १११ जण कोरोनातून बरे झाले आहेत. १ लाख ५१ हजार ५२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान. देशभरात कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. मागील २४ तासांत देशात १५ हजार ९६८ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. २०२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

याशिवाय, १७ हजार ८१७ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. देशाताली एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ४ लाख ९५ हजार १४७ वर पोहचली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १२ जानेवारीपर्यंत देशात १८,३४,८९,११४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ लाख ३६ हजार २२७ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

दरम्यान, पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मधील कोविड -१९ प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीचा पहिल्या टप्प्यातील साठा दिल्लीत पोहोचवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी हा साठा पुण्यातून पाठविण्यात आला होता. तो काही तासांतच विमानाने दिल्लीत पोहोचला. देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी देखील झाली आहे.

“पुण्याहून १३ शहरांत लस पोहोचवण्यासाठी चार एअरलाइन्सची विमाने नऊ उड्डाणे करणार आहेत. एकूण ५६.५ लाख डोस पहिल्या खेपेत देशभरात पाठवले जाणार आहेत. कोव्हिशिल्ड ही लस ब्रिटिश स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केली असून ती भारतात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड नावाने उत्पादित केली आहे”, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली आहे.