Coronavirus : देशात ‘कोरोना’चा विस्फोट ! 24 तासात 1 हजारापेक्षा जास्त मृत्यू, 1.84 लाखांहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याचे दररोज येणाऱ्या आकडेवारीतून दिसून येत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचे नवनवीन उचांक नोंदवले जात आहे. मंगळवारी आतापर्यंतची विक्रमी रुग्णवाढ नोदवण्यात आली. यामध्ये सर्वांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे रुग्णसंख्येबरोबरच देशात मृतांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात देशात 1 हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत फेब्रुवारीपर्यंत दिवसाला दहा ते तेरा हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारीनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत याची तीव्रता वाढली आहे. अवघ्या दोन महिन्यात पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला आहे. सध्या रुग्ण वाढ होण्याचे प्रमाण वाढले असून दररोज विक्रमी रुग्णवाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तसात 1 लाख 84 हजार 372 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 027 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 82 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 72 हजार 82 जणांचा मृत्यू झाला आह. सध्या 13 लाख 65 हजार 704 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 23 लाख 36 हजार 036 रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवार पर्यंत देशात 11 कोटी 11 लाख 79 हजार 578 जणांना लस देण्यात आली आहे.