Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 996 जण ‘कोरोना’मुक्त, पण धोका अजुनही टळलेला नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील कोरोनाचा विळखा सैल झाला असला तरी साथ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. दैनंदिन रुग्णसंख्या अद्यापही मोठी आहे. नवीन आढळणा-या कोरोना रुग्ण संख्येसह मृत्यूंच्या संख्येतही दररोज भरच पडताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 19 हजार 78 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 22 हजार 926 जण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, कोरोनामुळे 224 रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 3 लाख 5 हजार 788 वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात 2 लाख 50 हजार 183 ॲक्टीव्ह केसेस असून,99 लाख 6 हजार 387 जण आतापर्यंत कोरोनातून बरे झालेले आहेत. याशिवाय, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 1 लाख 49 हजार 218 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटाखाली असलेल्या भारतीयांसाठी चांगली बातमी काल(शुक्रवारी) समोर आलेली आहे. ऑक्सफर्ड- ॲमस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि सीरम संस्थेने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली आहे.

देशभरात होणाऱ्या लसीकरणाच्या सराव फेरीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीची बैठक झाली. बैठकीत ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली असून, आता भारताच्या महाऔषध नियंत्रकांच्या (डीसीजीआय) परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी मिळवणारी ही पहिली लस ठरणार आहे. केंद्र सरकारने शनिवार (दि. 2) पासून देशात ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली असून यात पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.