Coronavirus in India : देशातील ‘कोरोना’ परिस्थिती चिंताजनक ! सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक नवे रुग्ण, 1100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. देशातील अनेक राज्यांतील आरोग्य प्रशासन सुविधांच्या कमतरेमुळे बेजार झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देखील दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत तर 1100 पेक्षा जास्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी एकूण 2 लाख 17 हजार 353 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे भारताने कोरोना संक्रमित रुग्णांचा आणखी एक विक्रम कायम केला आहे. याच दरम्यान 24 तासात देशात तब्बल 1 हजार 185 कोरोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर 1 लाख 18 हजार 302 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 42 लाख 91 हजार 917 वर पोहचली आहे. तर आजपर्यंत देशात एकूण 1 लाख 74 हजार 308 नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमावावे लागले आहेत. सध्या देशात 15 लाख 69 हजार 743 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 6 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट धोकादयक बनली आहे. महाराष्ट्रात गुरवारी 62 हजारांच्या आसपास नवीन रुग्ण आढळून आले होते. देशात आतापर्यंत एकूण 26 कोटी 34 लाख 76 हजार 625 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 14 लाख 73 हजार 210 नमुन्यांची कोरोना चाचणी केवळ गुरुवारी करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 जणांना लस देण्यात आली आहे