Coronavirus in India : भारताने अमेरिकेलाही टाकले मागे; एकाच दिवशी 3.16 लाख नवे रुग्ण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात नवीन कोरोना रुग्णांचा आकडा विक्रमी ठरत असून आज भारतात २४ तासात सापडलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. भारतात बुधवारी दिवसभरात तब्बल ३ लाख १५ हजार ४७८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. एकाच दिवसात सापडलेले जगभरातील ही सर्वाधिक संख्या आहे.

याआधी जगात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत ८ जानेवारी २०२१ रोजी ३ लाख ७ हजार ५७० नवीन रुग्ण आढळून आले होते. गेल्या २४ तासात २१०१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी १ लाख ७९ हजार ३७२ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ८४ हजार ६७२ जणांचा मृत्यु झाला आहे़ कोरोना बाधितांची देशातील एकूण संख्या १ कोटी ५९ लाख २४ हजार ७३२ इतकी झाली आहे. देशात सध्या २२ लाख ८४ हजार २०९ सक्रीय रुग्ण आहेत.