चिंताजनक ! सलग 7 व्या दिवशी देशात 24 तासात नव्या ‘कोरोना’ रूग्णांचा आकडा 10 हजारांच्या टप्प्यात, बाधितांची संख्या 286579

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग सातव्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासात देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 357 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 6 जून रोजी सगळ्यात जास्त 298 लोकांचा मृत्यू झाला होता. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे. या आठवड्यात दररोज 9 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर मृतांचा आकडा 8 हजाराच्या वर गेला आहे. जगात कोरोना बाधितांच्या संख्येत भारत सहाव्या क्रमांकावर आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे सध्या 1 लाख 37 हजार 448 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर 8 हजार 102 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याच दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 14 हजार 28 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सलग दुसऱ्यांदा अॅक्टिव्ह केसेस पेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. भारताचा रिकव्हरी रेट 49.2 टक्के झाला आहे.

राज्यांचा विचार केला तर देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त 94 हजार कोरोनाचे रुग्ण आहत. तर दमण आणि दीवमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण दिल्लीहून दमणला आल्याचे बोलले जात आहे. सध्या या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. दुसरीकडे आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार 11 जून सकाळी 9 वाजेपर्यंत भारतात 52 लाख 13 हजार 140 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासात 51 हजार 808 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.