Coronavirus Impact : देवाच्या घरात देखील नोकरी नाही ‘सुरक्षित’, तिरूपती बालाजी मंदिरातील 1300 कर्मचार्‍यांना काढलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लॉकडाऊनचा परिणाम देशातील सर्वात श्रीमंत मंदिरावरही झाला आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरात काम करणारे 1300 कंत्राटी कामगारांना घरी पाठवण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांचा करार 30 एप्रिल रोजी संपला आणि मंदिर प्रशासनाने 1 मे पासून कराराचे नूतनीकरण करण्यास नकार दिला.

मंदिर ट्रस्टने लॉकडाऊनचे कारण दिले

वास्तविक, तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने करारावर काम करणाऱ्या 1300 कर्मचार्‍यांना 1 मे पासून कामावर येण्यास नकार दिला आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याचे मंदिर प्रशासन सांगते, त्यामुळे आता या 1300 कर्मचार्‍यांचे कंत्राट 30 एप्रिलनंतर पुढे वाढवले जाणार नाही. तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) ट्रस्टतर्फे तीन गेस्टहाऊस चालवले जातात, ज्यांचे नाव विष्णू निवासम, श्रीनिवासम आणि माधवम असे आहे. सर्व 1300 कर्मचार्‍यांनी बर्‍याच वर्षांपासून या अतिथीगृहात काम केले आहे.

तिरुपती बालाजी मंदिराचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे सर्व गेस्टहाउस बंद पडले होते, त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या कराराचा कालावधी वाढविण्यात आला नाही. ते म्हणाले की, या काळात नियमित कर्मचार्‍यांना देखील कोणतेही काम सोपविण्यात आलेले नाही.

20 मार्चपासून मंदिर आहे बंद

एका वृत्तपत्रानुसार, टीटीडी ट्रस्टचे प्रवक्ते टी. रवि म्हणाले की, सर्व निर्णय कायद्यानुसार घेण्यात आले आहेत. काम बंद पडल्यामुळे कर्मचार्‍यांना काम न देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूमुळे तिरुपती बालाजी मंदिर 20 मार्चपासून बंद आहे, परंतु मंदिरात दररोज धार्मिक विधी पुरोहित करत आहेत. या आर्थिक वर्षाचे या मंदिराचे बजेट 3,309 कोटी रुपये आहे.