भारतातील पहिल्या मोबाईल कॉलचा रौप्यमहोत्सव ! जाणून घ्या कुणी अन् कुठं केला होता पहिला कॉल

पोलीसनामा ऑनलाइन – तुम्हाला क्वचितच माहिती असेल की, मोबाईलच्या भारतातील प्रारंभाला आजच (शुक्रवार दि 31 जुलै) 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीच्या एरिअलच्या मोबाईलपासून तर आजच्या 5 जी पर्यंत मोबाईलमध्ये अनेक बदल झाले आहेत. भारतात 31 जुलै 1995 रोदी पहिला मोबाईल कॉल करण्यात आला होता.

भारतातील तो पहिला कॉल
पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी 31 जुलै 1995 रोजी पहिला मोबाईल कॉल केला होता. त्यांनी यावेळी तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कोलकाता ते दिल्ली असा हा कॉल झाला होता. बसू यांनी कोलकाता रॉयटर्स इमारतीतून दिल्लीतील संचार भवनला हा कॉल केला होता. मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी होती. ही कंपनी म्हणजे मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील दूरसंचार कंपनी टेल्स्ट्रा यांच्या भागिदारीतील उपक्रम होता. पहिला कॉल याच सेवेद्वारे करण्यात आला होता. मोबाईल नेट या नावानं ही सेवा ओळखली जात होती.

शुल्क आणि इंटरनेट सेवा
सुरुवातीला आऊटगोईंगसाठी 16 रुपये 40 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जात होते. इनकमिंगलादेखील 8 रुपये 40 पैसे असा दर होता. पहिल्या 5 वर्षातच देशातील मोबाईलधारकांची संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचली. विदेश संचार निगम लिमिटेडनं 1995 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीयांना इंटरनेटची भेट दिली.

व्हीसीएनएलनं देशात गेटवे इंटरनेट ॲक्सेस सर्व्हीस सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. सुरुवातीची इंटरनेट सेवा ही 4 महानगरांपुरतीच मर्यादित होती. त्यावेळी इंटरनेटसाठी 250 तासांसाठी 5 हजार रुपये शुल्क होतं. खासगी कंपन्यांसाठी हा जर 15 हजार रुपये होता.

कधी लाँच झालं 1G to 5G ?

1) 1G – 1980
2) 2G – 1990
3) 3G – 2000
4) 4G – 2010
5) 5G – 2020-2021