पाकिस्तानबाबत मोदी सरकारचा सर्वात मोठा धाडसी निर्णय, दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत चीन सीमावाद ताजा असतानाच आता पाकिस्तानसोबतचाही तणाव वाढत असताना केंद्र सरकारने पाकिस्तानबाबत एक मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या पाकिस्तानी दुतावासातल्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातल्या कर्मचाऱ्यांची संख्याही 50 टक्क्यांनी कमी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमध्ये भारतीय दुतावासातल्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग केल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना काही तास ताब्यातही घेण्यात आलं होतं. दिल्लीतल्या पाकिस्तानी दुतावसातले कर्मचारी हे भारताविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले असल्याचा संशय परारष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनसोबतच्या वादावर जे वक्तव्य दिलं होतं त्यामुळे लष्कराला मोठा धक्का बसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत त्यांनी हा आरोप केला होता. चीनने भारतीय भूमीवर कब्जा केलेला नाही आणि कोणतीही पोस्ट घेतलेली नाही असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. राहुल गांधी म्हणाले, चीननं निर्लज्जपणे भारताच्या भूमिवर ताबा मिळवलेला आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सरु असतानाच आता भाजपने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना थेट लक्ष्य केलं आहे. काँग्रेसकडून देशाच्या जवानांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. देशाचे लष्कर प्रमुख लेहच्या दौऱ्यावर असताना सीडब्ल्यूची बैठक घेऊन त्यामध्ये लष्कराच्या विरोधात चर्चा केली जात होती, आता तुम्हाला काय लष्करासोबत लढायचे आहे का, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.