टीम इंडियाच्या भल्यासाठी धोनीनं केला ‘त्याग’, ‘या’ कारणामुळे नव्हती घेतली आत्‍तापर्यंत ‘निवृत्‍ती’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पुढील महिन्यात होणार्‍या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने गुरुवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघामध्ये धोनीचा समावेश मात्र नाहीये. टी २० संघात त्याच्या सततच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या निवृत्तीच्या बातम्यांना उधाण आले आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी तर धोनीला संघात जागा नाकारल्याचा कयास बांधण्यास सुरुवात केली आहे.

या उलट सुलट चर्चांना सुरुवात झाल्यानंतर धोनी आगामी टी २० मालिकेत न खेळण्याबद्दल निवडकर्त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वर्ल्ड टी-२० साठी धोनीने संघ तयार करण्यास वेळ दिला आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा संघाचे भविष्य यशस्वी हातात असेल तेव्हाच आपल्या कारकीर्दीविषयी निर्णय घेणार असल्याचे आश्वासन धोनीने दिले आहे. त्याचबरोबर विकेटकीपिंग साठी भारतीय संघाकडे पुरेसे पर्याय आहेत याची निवड समितीला खात्री पटेल तेव्हा धोनी निवृत्तीचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे.

निवड समितीचे सदस्य पुढे म्हणाले, ‘धोनीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याऐवजी पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धा ध्यानात घेऊन आम्ही एखादी योजना तयार करू शकू यासाठी धोनीने आम्हाला भविष्यासाठी वेळ दिला आहे. धोनी नेहमीच संघाच्या हिताला प्राधान्य देत आला आहे. आम्हाला हे देखील समजले आहे ऋषभ पंत जखमी झाल्यास आमच्याकडे शॉर्ट फॉरमॅटमध्ये त्याचा योग्य पर्याय नाही. या कारणास्तव धोनीने काही काळ थांबायचे ठरवले आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यासंबंधात चर्चा होण्याला अर्थ नाही.’

यावेळी निवडकर्त्यांनीही हेही स्पष्ट केले की वर्ल्ड कप २०१९ नंतर धोनीच्या भविष्याबाबत काही सांगता येणार नाही. ते म्हणाले, ‘आम्ही आतापर्यंत त्याच्याबरोबर या विषयावर सविस्तर बोललो नाही. त्याने आम्हाला थोडा वेळ दिला आहे जेणेकरुन आम्ही भविष्यासाठी योजना तयार करू आणि पर्याय शोधू शकू. जर ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला आणि काही कारणास्तव टी-२० वर्ल्डमध्ये भाग घेऊ शकला नाही तर धोनीशिवाय आम्हाला दुसरा पर्याय दिसत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –