जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहिल; युनोसिटीमध्ये पाकिस्तानला ‘चपराक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर निरनिराळ्या कारणांवरून पाकिस्तानने भारताला घेरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु असे असतानाही पाकिस्तानच तोंडावर पडल्याचे दिसून आले आहे . दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या आरोपावरूनही अनेकदा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने घेरले होते. जम्मू काश्मीरबाबत पाकिस्तानने कुरापती करणे सोडून द्यावे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि कायम राहिल, असे म्हणत भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला चपराक लगावली आहे.

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहिल, अशी प्रतिक्रिया काऊंटर टेररिजमचे परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव महावीर सिंघवी व्यक्त केली. ‘युनोसिटी व्हर्च्युअल काऊंटर टेररिझम विक’ला संबोधित करताना ते बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती आता थांबवल्या पाहिजेत. पाकिस्तानकडून दुसरंच काही दाखवण्याचा प्रयत्न होतो. परंतु ते जे करत आहेत तो म्हणजे प्रायोजित सीमापार दहशतवाद आहे, असं सिंघवी म्हणाले.

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रॉक्सी वॉर आणि प्रायोजित सीमापार दहशतवादानंतरही काश्मीरमधील जनतेने भारतीय लोकशाहीवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. भारताने याचा नेहमीच पुनरुच्चार केला आहे, असे सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे. भारताने कायमच जगभरात मानवाधिकाराचे जतन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. दहशतवादाविरोधात कायम कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवादाविरोधात भारताने कायम पावले उचलली आहेत.