‘म्हणून’ धावपटू द्युती चंदने दिली समलैंगिक असल्याची जाहीर कबुली  

ओडिशा : वृत्तसंस्था – भारताची जलद धावपटू द्युती चंदने एका मुलाखतीत जाहीरपणे आपण समलैंगिक असल्याची जाहीर कबुली दिल्यामुळे चर्चेत आली आहे. माझ्या मोठ्या बहिणीने मला ब्लॅकमेल केले. तिने माझ्याकडून २५ लाख रुपयांची मागणी केली. अशी धक्कादायक माहिती द्युती चंदने दिली आहे.

द्युतीच्या या प्रेमसंबंधांना तिच्या घरातूनच विरोध झाला आहे. तिच्या बहिणीने तिला तुरुंगात टाकण्याचा आणि घरातून बाहेर काढण्याचा देण्याचा इशाराही दिला आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत होते. द्युतीची समलिंगी जोडीदार हिने द्युतीला ब्लॅकमेल केले असून मालमत्ता आणि पैशासाठी तिने द्युतीवर दबाव टाकला असे द्युतीच्या बहिणीचे म्हणणे आहे. या सर्व प्रकाराबाबत द्युतीने स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझ्या मोठ्या बहिणीने मला ब्लॅकमेल केले. तिने माझ्याकडून २५ लाख रुपयांची मागणी केली. तिने मला एकदा मारहाणही केली. याबाबत मी पोलिसांकडे तक्रारही केली होती. तिने मला माझ्या समलिंगी रिलेशनशीपबद्दल ब्लॅकमेल केले, त्यामुळे मला याबाबत जाहीरपणे बोलावे लागले, अशी माहिती तिने दिली आहे. ‘

आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत हे सांगताना द्युती म्हणाली की , ‘मी माघार न घेण्यामागे २ महत्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मी यात काहीही चुकीचं केलेलं नाही. आणि दुसरं कारण म्हणजे मला समलिंगी संबंधांमध्ये असल्याबाबत अजिबात वाईट वाटत नाही किंवा लाज वाटत नाही. उलट मी अभिमानाने सांगते की मी समलिंगी संबंधांमध्ये आहे. तिला जे हवं ते तिने करावं, पण मी मात्र आता मागे हटणार नाही.’

समलिंगी संबंधांत असल्याचं जाहीरपणे सांगणारी द्युती ही पहिलीच भारतीय क्रीडापटू ठरली आहे. द्युती चंदने आशियाई स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून दिले. पी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युतीने पटकावला.