इरफानची ‘स्फोटक’ बॅटिंग, सचीननं देखील केलं ‘कौतुक’ (व्हिडिओ)

मुंबई : वृत्तसंस्था – अनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताकडून इरफान पठाणने नाबाद 57 धावांची स्फोटक खेळी केली. इरफान पठाणच्या या स्फोटक बॅटिंगचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. 139 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खऱाब झाली. विरेंद्र सेहवाग तीन धावात बाद झाला तर कर्णधार सचिन तेंडुलकरला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर युवराज सिंह केवळ एक धाव करून बाद झाला. त्यानंतर मोहम्मद कैफ आणि संजय बांगर यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली. बांगरने 18 धावा केल्या. बांगर बाद झाल्यानंतर कैफ 46 धावांवर बाद झाला.

भारतीय संघाला अखेरच्या 5 षटकात 55 धावांची गरज होती. तेव्हा इरफान फठाणने वादळी खेळी केली. त्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकरांसह 57 धवांची खेळी केली. इरफानने मनप्रीत गोनीसह सहाव्या विकेटसाठी 58 धावांची भागिदारी केली. त्यामुळे भारताने श्रीलंकेवर 5 विकेटनी विजय मिळवला. इरफान पठाणच्या चौकार आणि षटकारांची फटकेबाजी बघून सचिन तेंडुलकर ड्रेसिंग रुममधून बाहेर आला. त्याने इरफानला प्रोत्साहन देत त्याच्या प्रत्येक फटक्यावर टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.