Coronavirus : नवीन रूग्णांच्या प्रकरणात जगात भारत चौथ्या नंबरवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहानमधून सुरू झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगातील ५० लाखाहून अधिक लोक संक्रमित आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतावरही कोरोनाचा वाईट परिणाम झाला आहे. कोरोनाचे आकडे दररोज रेकॉर्ड तोडत आहेत. आतापर्यंत भारतात १.१३ लाखांहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे नव्या प्रकरणांच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. ज्यामुळे सरकारची चिंता वाढणे साहजिक आहे.

कोरोना डेटा ठेवणारी साइट www.worldometers.info नुसार, अमेरिका कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहे. जेथे बुधवारी २२,१४० नवीन प्रकरणे आढळली होती. त्यानंतर बुधवारी ब्राझीलमध्ये २१,४७२ आणि रशियामध्ये ८७६४ प्रकरणे समोर आली. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. जेथे ५५५३ प्रकरणे नोंदवली गेली. यासोबत भारतात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १,१२,०२८ वर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. तज्ञांच्या मते लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणि टेस्टिंगची संख्या वाढल्यामुळे इतकी प्रकरणे समोर येत आहे. भारतात कोरोनाबद्दल एक दिलासा देणारी बातमी देखील असून आतापर्यंत ४५,९०८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

भारतात कोरोनामुळे महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित आहे. जिथे आतापर्यंत ३९,२९७ प्रकरणे समोर आली आहेत. यामधील १३९० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १०,३१८ लोक बरे झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत परिस्थिती अत्यंत वाईट असून तिथे आतापर्यंत २४,११८ रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू दुसर्‍या क्रमांकावर असून तिथे १३,१९१ प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर गुजरातमध्ये १२,५३९ आणि दिल्लीत ११,६५९ रुग्ण आढळले आहेत.