‘कोरोना’मुळं ब्रिटनमध्ये हाहाकार, मोदी सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली,दि. 21 डिसेंबर : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा आणि अगोदरच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आला आहे, त्यामुळे केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 22 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय 31 डिसेंबर 2020पर्यंत लागू असेल.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमाने रोखण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आणखी काही मुख्यमंत्री आणि नेत्यांनी ब्रिटनहून येणारी विमानं रोखा, असं आवाहन केंद्राला केलं होतं. त्यानंतर आता केंद्र सरकारने विमानं सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. उद्यापासून ही हवाई सेवा रोखले जाईल. त्यापूर्वी भारतात येणार्‍या लोकांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असणार आहे.

अरविंद केजरीवाल, अशोक गेहलोत यांनी केली होती हि मागणी
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या लाटेमुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती लक्षात घेता युरोपमधून भारतात येणार्‍या विमानांवर बंदी घालावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आलंय.

युरोपातील ब्रिटन येथे हाहा:कार
कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, चिली, बग्लेरिया आणि दक्षिण अरबकडून ब्रिटनच्या प्रवासावर बंदीची घोषणा केलीय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे दक्षिण इंग्लंडमधील बाजार ख्रिसमस अगोदरच बंद करण्याची घोषणा केलीय. ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कडक लॉकडाऊनची घोषणा बोरिस जॉन्सन यांनी केलीय.

कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता 70 टक्क्यांनी वाढली
ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, अशी माहिती वैज्ञानिकांनी दिलीय. याचा अर्थ असा आहे की, नव्या विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो. लोकांना दिले जात असलेली कोरोना विषाणूची लस नव्या स्ट्रेनविरूद्ध लढण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अन् शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा प्रसारामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसेच सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.