भारतात 2020 च्या अखेरपर्यंत ‘भयानक’ भूकंप होणार, वैज्ञानिकांचा धोक्याचा इशारा

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले, अर्थव्यवस्था ढासळली, कंपन्या बंद पडल्या तर काही ठिकाणी पगारकपात करण्यात आली. त्यामुळे २०२० हे वर्षंच सर्वांसाठीच चिंता वाढवणारे ठरले आहे. त्यातच आता वर्षाच्या अखेरपर्यंत भारतावर आणखी एक संकट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसांत पूर्ण हिमालय क्षेत्रात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले जातील, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

देशाचे शत्रूंपासून संरक्षण करण्यात हिमालयाची मोठी भूमिका आहे. तसेच हिमालयाच्या पर्वतरांगा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून देशाचा बचाव करतात. पण आता हिमालयामुळे देशावर संकट ओढवण्याची शक्यता आहे. हिमालयातील पर्वतांच्या पृष्ठभागांसह मातीचे परीक्षण आणि रेडिओकार्बन विश्लेषण वैज्ञानिकांनी केले असून, भूवैज्ञानिक, भौगोलिक माहितीच्या अभ्यासातून त्यांनी हा भूकंपाचा अंदाज वर्तवला आहे. यासंदर्भातला अहवाल ‘सिस्मोलॉजिकल रिसर्च लेटर्स जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

भारताच्या पूर्वेपासून ते पाकिस्तानच्या पश्चिमेकडेपर्यंत हिमालयाच्या पर्वतरांगा पसरल्या आहेत. जर भूकंप झाला तर सर्व भागांवर त्याचा प्रभाव पडेल. यापूर्वीही हा भाग अनेक मोठ्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. वैज्ञानिकांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरली तर भारताच्या चंदिगढ, देहरादून आणि नेपाळच्या काठमांडूपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते.