‘मी बंगाल मधून ममतांचे सरकार उलथून टाकण्यासाठी आलो आहे, सांभाळण्यासाठी नाही’ : अमित शाह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या दंगलीदरम्यान इंडिया टुडे ईस्ट कॉन्क्लेव्ह 2021 चे आयोजन करण्यात आले होते. या व्यासपीठावर गृहमंत्री अमित शाह पोहोचले. यावेळी त्यांनी बंगालबाबत भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) मत व्यक्त केले आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले.

अमित शाह म्हणाले, ‘मी बंगालमध्ये ममता यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी आलो आहे. सांभाळायला आलो नाही. टीएमसी सरकार उलथून टाकल्याशिवाय भाजपा सरकार येथे येऊ शकत नाही. ममताजी यांचे सरकार व्यवस्थितपणे काम करत नाही, जनता या सरकारला उखडून फेकून देईल. आमची ममता दीदींशी कोणतीही कटुता नाही. पण त्यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचार होत आहे, त्यावरून जनतेला चीड येते मग कोण काय करू शकेल.’

‘सरकार स्थापन झाल्यावर मिळेल थकबाकी’

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले की, ‘मला बंगालमधील शेतकऱ्यांना सांगायचे आहे की आमचे सरकार स्थापन झाल्यावर आम्ही तेथील शेतकर्‍यांना त्यांची 12,000 रुपये थकबाकी आणि 6,000 रुपयांचा नवीन हप्ताही देऊ. अमित शाह म्हणाले की बंगालच्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये. पीएम मोदी म्हणाले की आमचे सरकार बनल्यानंतर आम्ही 12 हजार रुपये शेतकऱ्यांना परत करू.

बदल घडवून आणणे हाच खरा हेतू

अमित शाह म्हणाले की परिवर्तन यात्रा हे नाव ठेवण्यामागील भाजपाचा हेतू फक्त मुख्यमंत्री, सत्ता किंवा कोणत्याही मंत्र्यांना बदलणे नव्हे. आमचं उद्दिष्ट आहे बंगालमधील परिस्थिती बदलणे. परिस्थितीत बदल तेव्हा घडतो जेव्हा लोकांमध्ये इच्छा आणि आकांक्षा आपण जागृत करतो. मला वाटते की बंगालमध्ये सरकार स्थापल्यानंतर हिंसाचाराची संस्कृती बदलेल. ही बंगालची संस्कृती नाही, तर गेल्या 30-35 वर्षात ही संस्कृती इथे विकसित झाली आहे.

‘200 पेक्षा जास्त जागांवर जिंकू’

अमित शाह यांनी बंगालमध्ये भाजपाचे सरकार स्थापन करण्याचा पूर्ण विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, 200 हून अधिक जागांसह भाजपा येथे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार आणि हे निश्चित आहे. ते म्हणाले की लोक असा विचार करतील हा माणूस असं कसं बोलू शकतो, परंतु मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगत आहे की भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. बंगालची जनता भाजपाबरोबर आहे.

ममता सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी- शाह

गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देखील आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की सीएए (CAA) हा देशाच्या संसदेने बनवलेला कायदा आहे, त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि निर्वासितांना नागरिकत्व मिळेल. ममता सरकार अर्थव्यवस्थेसह प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. येथील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे, हा देखील आपला मुद्दा आहे.

‘आपल्याला सीएए लागू करायचा आहे’

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (सीएए) अमित शहा म्हणाले की, एप्रिलनंतर आम्हाला सीएए लागू करायचा आहे, आता सरकार बदलेल त्यामुळे त्यांना हे काम करण्याची गरज नाही. सीएए देशाच्या संसदेने तयार केला आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. निर्वासितांना नागरिकत्व दिले जाईल.

ओवेसींनी सीएएविरोधात पुन्हा आंदोलन सुरू केल्यावर अमित शाह म्हणाले की लोकशाहीमध्ये निषेध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तथापि, ओवेसी भाजपाच्या इशाऱ्यावर बंगालमध्ये निवडणूक लढवण्यास येत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. अमित शाह म्हणाले की असदुद्दीन ओवेसी यांनी फक्त हैदराबादमध्येच निवडणूक लढावी असे आपण कसे म्हणावे? आपण देशाची घटना बदलू शकतो का? प्रत्येक व्यक्तीला आणि पक्षाला स्वत:चा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आहे.

कोण होईल मुख्यमंत्री, शाह यांनी दिले उत्तर

बंगालमध्ये भाजपाकडून मुख्यमंत्री कोण बनेल? यावर अमित शाह यांनी स्पष्ट केले की पश्चिम बंगालचे पुढचे मुख्यमंत्री बंगालचेच असणार आहेत. ते म्हणाले की बंगालचाच मुख्यमंत्री असेल आणि तो देखील भाजपाचाच असेल, पण कैलास विजयवर्गीय मुख्यमंत्री होणार नाहीत. जेव्हा त्यांना विचारले गेले की टीएमएसी मधून आलेला नेता देखील नाही बनणार का? यावर अमित शाह म्हणाले की ते असे म्हणालेच नाहीत तर बंगालचाच भूमिपुत्र मुख्यमंत्री होईल असे येते म्हणाले.