मोबाईल 5G तंत्रज्ञानात भारत-अमेरिका-इस्रायलचे एकमेकांना सहकार्य

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले आहे. त्यातच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत. त्यामुळे चीनवर तिन्हीही देशांनी डाव टाकला आहे.

फाइव्ह जी तंत्रज्ञानात या तीन देशांनी पुढाकार घेतला असून अमेरिकेतील भारतीय लोक व इस्रायल यांच्यातील संपर्कातून हा प्रस्ताव पुढे आला आहे. या तीन देशांनी सहकार्य करावे, असे जुलै 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भेटीत सूचित केले होते. त्यानुसार यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या संस्थेच्या उपप्रशासक बोनी ग्लिक यांनी सांगितले की, अनेक क्षेत्रात आम्ही सहकार्य करणार आहोत.

भारत-अमेरिका-इस्रायल यांच्या आभासी शिखर बैठकीत चर्चा करण्यात आली. जगातील विकासाची आव्हाने हे तीन देश एकत्र येऊन पेलू शकतात. इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का व त्यांचे इस्रायलमधील समपदस्थ संजीव सिंगला यांची भाषणे झाली. फाइव्ह जी तंत्रज्ञानात तीनही देश सहकार्य करतील. सिलिकॉन व्हॅली, बंगळूरु, तेलअवीव यांनी तंत्रज्ञानाची प्रमुख ठिकाणे म्हणून नाव कमावले आहे. त्यामुळे तीनही देश फाइव्ह जी तंत्रज्ञानात आश्वासक कामगिरी करू शकतील. कुठल्याही देशाला या तंत्रज्ञानात मक्तेदारी मिरवता येणार नाही, असे गिल यांनी चीनचा उल्लेख टाळून सांगितले.