US भारतासोबत आल्यानं चीनची ‘आगपाखड’, दिलं तैवानचं उदाहरण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतासोबत असलेल्या तणावादरम्यान चीनला आता चिंता सतावू लागली आहे की, आपल्या विरोधात भारत आणि अमेरिका एकत्र येऊ नये. अमेरिकेने गुरुवारी युरोपमधील आपले सैन्य कमी करून आशियामध्ये वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी म्हटले की, भारत आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या समोर चीनचा वाढता धोका पाहता अमेरिका युरोपमधील आपले सैन्य कमी करून योग्य ठिकाणी तैनात करणार आहे. या सर्व घटनांवरून चीनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये भारताने अमेरिकेच्या जवळ जाण्यावरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

फायनान्शियल टाइम्सचे एक कॉलमिस्ट गिडोन रॅचमॅन यांनी लिहिले की, भारताने नव्या शीत युद्धात एक बाजू निवडली आहे. यासोबतच म्हटले आहे की, हा चीनचा मूर्खपणा आहे की, तो आपला प्रतिस्पर्ध्याला अमेरिकेच्या पारड्यात टाकत आहे.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, चीन आणि भारतामध्ये सीमा वाद एका रात्रीत निर्माण झालेला नाही. एकेकाळी दोन्ही देशांमध्ये मोठ्या तणावाचा धोका होता. भारत तेव्हासुद्धा कोणत्याही देशावर अवलंबून राहिला नाही, यामुळे हे एकदम चुकीचे आहे की, सध्याच्या सीमा तणावात भारत कोणत्या एका गटाच्या सोबत जाण्यासाठी असाहय्य होईल.

यात पुढे म्हटले आहे की, सीमा तणावाला एका युद्धाकडे नेण्याची चीनची इच्छा नाही. गलवान खोर्‍यात भारतीय बाजूकडून उकसवण्यात आल्यानंतर संघर्ष सुरू झाला होता. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मान्य केले की, भारतीय सीमेच्या आत घुसखोरी झाली नाही.

ग्लोबल टाइम्सने लिहिले, रॅचमॅनसारख्या लोकांनी अमेरिकेच्या आकर्षणाचा चुकीचा अर्थ लावला आहे. आम्ही अमेरिकेच्या हातात सापडलेले देश आणि भागांना पाहिले आहे, ते सर्व अमेरिका किंवा त्याच्या हितासाठी काम करण्यास इच्छुक आहेत. ऑस्ट्रेलिया असो, कॅनडा असो की तैवान असो, या सर्वांची मोजदाद यामध्येच करता येईल. परंतु, हे देश आपल्या हितांचा सौदा करत आहेत किंवा आपले सार्वभौमत्व अमेरिकेच्या हातात देत आहेत. तैवानच्या बाबतीत सार्वभौमत्वाबाबत बोलणेही चुकीचे आहे, कारण त्याचे सर्व हित अमेरिकेच्या नियंत्रणात आहे. त्याची इच्छा असो किंवा नसो, त्यांना अमेरिकेच्या इशार्‍यावर नाचावे लागते. मात्र, ही कल्पना अवघड आहे, एखादा मोठा देश अमेरिकेच्या हातात राहाणे पसंद करेल. भारताची ही विशेषता आहे की, तो आपले मुत्सद्दीपणाचे स्वातंत्र कायम ठेवू इच्छितो.

चीनी सरकारच्या मुखपत्रात लिहिले आहे की, वॉशिंग्टन आणि नवी दिल्लीच्या दरम्यान संबंध पश्चिमी विश्लेषकांच्या मतापासून अजून खुप दूर आहेत. दोन्ही पक्ष केवळ एकमेकांचा वापर करत आहेत. अमेरिका इंडो-पॅसिपिकच्या रणनितीत भारताला आपले प्यादे बनवू पहात आहे, जेणेकरून चीनला रोखता येईल आणि जगात आपले प्रभुत्व कायम ठेवता येईल.

दुसरीकडे, भारत अमेरिकेचा वापर दक्षिण-पूर्व आशियामध्ये चीनच्या प्रभावाला काऊंटर करणे आणि पाकिस्तानला रोखण्यासाठी करत आहे, यासाठी तो अमेरिकेच्या सोबत जवळीक वाढवत आहे. मात्र, भारतसुद्धा हे चांगल्याप्रकारे जाणतो की, अमेरिका त्याचे लक्ष्य गाठण्यासाठी त्याला मदत करणार नाही.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, अमेरिका भारताची रशियाकडून शस्त्र खरेदी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि भारताच्या सैन्य उद्योगावर आपले नियंत्रण स्थापित करण्याची इच्छा बाळगून आहे. परंतु, हे अशक्य आहे की, भारताला याचा अंदाज नसेल. रशियाकडून भारताने शस्त्र खरेदी करून आपली दिशा स्पष्ट केली आहे.

शेवटी ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, भारत-चीन सीमा वादात कितीही चढ-उतार आले आणि भारताने कोणतेही पाऊल उचलले, तरी चीनची बाजू हीच आहे की, सर्व वादांवर तोडगा केवळ चर्चेतूनच काढला जाऊ शकतो. यामध्ये आपल्याला कोणत्याही बाहेरच्या शक्तीची गरज नाही.