India vs Australia T20 :ऑस्ट्रेलियाचा पराभव करून टीम इंडियानं मोडला पाकिस्तानचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दुसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यामध्ये दमदार खेळ केला. मॅथ्यू वेड व डी’आर्सी शॉर्ट यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिलीय. वेडच्या फटकेबाजीनंतर स्टीव्हन स्मिथने आक्रमक खेळ करून ऑस्ट्रेलियाने भारतासमोर तगडं आव्हान दिलं होतं.

प्रत्युत्तरामध्ये लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात केली. यावेळी धवनने फटकेबाजी करताना 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं असून त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने टीम इंडियाला विजयी पथावर आणले. भारताने मालिकेमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतलीय. या कामगिरीसह टीम इंडियाने पाकिस्तानचा विक्रम मोडलाय.

फिंचच्या अनुपस्थितीमध्ये नेतृत्वाची जबाबदारी मिळालेल्या मॅथ्यू वेडनं डी’आर्सी शॉर्टसह डावाची सुरुवात केलीय. 8 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर वेडचा सोपा झेल विराट कोहलीकडून सुटला. वेडलाही वाटलं होतं की, हा झेल टिपला जाईल म्हणून तो क्रिज सोडून बराच पुढे आला होता. विराटने लगेच चेंडू थ्रो करून वेडला धावबाद केले. वेडनं 32 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकार खेचून 58 धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं 13 चेंडूंमध्ये 2 षटकारांसह 22 धावा केल्या आहेत. शार्दूल ठाकूरनं त्याला बाद केलं. मोइजेस हेन्रीक्स याच्यासह स्मिथनं 47 धावा केल्या. स्मिथ 38 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकार खेचून 46 धावांवर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झालाय. हेन्रीक्सही 18 चेंडूंत 26 धावा करून टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. नटराजनने 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या असून ऑस्ट्रेलियानं 5 बाद 194 धावा केल्या आहेत.

प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. राहुल आणि धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली होती. मात्र, सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिलाय. राहुल हा 22 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकार मारून 30 धावांवर झेलबाद झाला. तर, त्यानंतर धवननं फटकेबाजी करताना 34 चेंडूंत अर्धशतक केलं. पण, अ‍ॅडम झम्पानं 36 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकार मारून 52 धावा करणार्‍या धवनला माघारी पाठवून टीम इंडियाला धक्का दिलाय.

संजू सॅमसन (15) पुन्हा अपयशी ठरला आहे. विजयासाठी 46 धावांची गरज असताना डॅनिएल सॅम्सनं ऑसींना मोठी विकेट मिळवून दिलीय. विराट 24 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारासह 40 धावांत माघारी परतला. हार्दिक आणि श्रेयस अय्यरनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करून सामन्यासह मालिकाही खेचली.हार्दिक 22 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावांवर, तर अय्यर 5 चेंडूंत 12 धावांवर नाबाद राहिला. भारताने 6 विकेट्स राखून हा सामना जिंकलाय.

…असा मोडला पाकिस्तानचा विक्रम
सलग 10 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये टीम इंडिया अपराजित राहिलीय. या कामगिरीसह टीम इंडियाने सलग 9 ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडलाय. पाकिस्तानने जुलै 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये सलग 9 ट्वेंटी-20 सामने जिंकले होते. टीम इंडियाने मागील वर्षी डिसेंबरपासून एकही टी-20 लढत गमावलेली नाही. सलग सर्वाधिक ट्वेंटी-20 लढती जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी 2018 ते 2019 या कालावधीमध्ये 12 लढती जिंकल्या आहेत. यापूर्वी त्यांनी 2016 ते 2017 या काळामध्ये सलग 11 सामन्यात विजय मिळवला होता.