India vs Australia, 3rd Test : खेळाडूंच्या कामगिरीवर अजिंक्य रहाणे खुश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – India vs Australia, 3rd Test Day 5 : आज ४०७ धावांचे तगडे आव्हान समोर ठेवून ऑस्ट्रेलिया विजयाच्या धुंदीत होती. पण, अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) सारखा संयमी व सकारात्मक विचार कर्णधार असताना संघात काही होऊ शकते. याची प्रचिती पुन्हा आली. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) व रिषभ पंत ( Rishabh Pant) दुखापतग्रस्त झाल्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी कमकुवत झाली होती. दरम्यान, या विजयानंतर अजिंक्यनं ट्विट केलं की, ”जखमी झालो. तुटलो, परंतु जिद्द हरलो नाही. खेळाडूंनी दाखवलेली लढाऊ वृत्ती पाहून आनंद झाला. या सामन्यातून बरंच काही शिकलो आणि ब्रिस्बेन कसोटीत सुधारणा करून मैदानावर उतरणार आहोत.

मेलबर्नमधील ऐतिहासिक विजयानंतर सिडनीतही टीम इंडियानं अजिंक्यच्या नेतृत्वाखाली अपराजित राहण्याची मालिका कायम राखली. रिषभच्या आक्रमक ९७ धावा, चेतेश्वर पुजारा व रोहित शर्माची अर्धशतकं आणि त्यानंतर हनुमा विहारी व आर अश्विन यांचा सॉलिड डिफेन्स… याच्या जोरावर टीम इंडियानं अश्यक्य सामना अनिर्णीत राखला. ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात अजिंक्य बाद झाला अन् ऑस्ट्रेलियाला वाटलं विजय आपलाच. त्यांच्या या स्वप्नावर आर अश्विन ( R Ashwin) आणि हनुमा विहारी ( Hanuma Vihari) यांनी पाणी फिरवलं.

विहारी-अश्विननं २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला. विहारी १६१ चेंडूंत २३, तर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मानं ९८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांची खेळी केली. शुबमन गिल ३१ धावांवर, तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाले. पुजारानं २०५ चेंडूंत १२ चौकारांसह ७७ धावा केल्या. रिषभ पंतनं ११८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावा चोपल्या. मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीतच आहे आणि १५ जानेवारीपासून चौथा व अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अजिंक्य म्हणाला, ”सकाळी सर्व खेळाडूंशी चर्चा केली आणि जिद्द दाखवून अखेरपर्यंत लढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावातही ऑस्ट्रेलिया २ बाद २०० धावांवर होता, परंतु त्यांना ३३८ धावांवर आम्ही रोखले. विहारी व अश्विन यांच्या नाव घेतल्याशिवाय या ऐतिहासिक कामगिरीचे वर्णन अपूर्णच… त्यांनी चिकाटीनं फलंदाजी केली. पंतलाही श्रेय द्यायला हवं. आम्ही तयार केलेल्या रणनितीची खेळाडूंनी अचूक अंमलबजावणी केली.”