राष्ट्रगीत सुरू असताना भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज झाला भावुक; व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – भारत ऑस्ट्रेलिया या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज हा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी कानावर पडली. कोरोना संकटात बायो-बबल नियमांमुळे आणि राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे त्याला वडिलांचं शेवटचं दर्शनही घेता आले नाही. सिराजच्या वडिलांचं स्वप्न होत, मुलानं टीम इंडियाकडून खेळावं, हे स्वप्न त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पूर्ण केलं आहे. कसोटी पदार्पणातच दमदार कामगिरी करून संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. सिराजचे वडील हे एक रिक्षाचालक होते. एका रिक्षाचालकाचा मुलगा ते टीम इंडियाचा गोलंदाज असा मोहम्मद सिराज याचा प्रवास आणि त्याने वडिलांचे पूर्ण केलेले स्वप्न अशा कामगिरीतून तो इथपर्यंत आल्याने आणि वडिलांनी साथ न राहिल्याने तेव्हा सिराजला अश्रू अनावर होणे साहजिकच आहे.

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज याची ही कहाणी. तिसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना सिराजच्या डोळे पाणावले होते. आपल्या भावनांना अश्रूंवाटे तो वाट मोकळी करून देत होता. स्थानिक स्पर्धांमध्ये तो जेव्हा पहिला सामना खेळला तेव्हा त्यानं २० धावा देत ९ विकेट्स घेतल्या आणि त्यासाठी त्याला ५०० रुपये बक्षीस मिळाले होते. क्रिकेटनं दिलेला हा पहिला पुरस्कार होता.

सिराजचे वडील रिक्षाचालक असून, त्यांनी मुलांच्या स्वप्नांत परिस्थिती कधीच आड आणली नाही. मुलांच्या स्वप्नांसाठी ते दिवसरात्र कष्ट करत राहिले. हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोहम्मद सिराज मोठा झाला.मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सिराजचे वडील मोहम्मद गौस ( ५३ वर्ष) यांचे निधन झाले, त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता.

मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि तेव्हा सिराजला कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात सिराजने दोन्ही डावांत ( २/४० व ३/३७) पाच विकेट्स घेतल्या. बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला. तसेच पदार्पणात गोलंदाजीत ओपनिंग न करताना भारतीय गोलंदाजानं केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी सय्यद अबीद अली यांनी १९६७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत ११६ धावांत ७ विकेट्स घेतल्या होता. तिसऱ्या कसोटीपूर्वी राष्ट्रगीताच्यावेळी भावुक झालेला सिराजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.