India Vs Australia : क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही; वर्णद्वेषी टीकेवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईनः ‘खेळ म्हणजे सर्वांना एकत्र आणणे, लोकांमध्ये फूट पाडणे नाही. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही. बॅट आणि बॉल यांना केवळ खेळाडूमधले टॅलेंट समजते. त्याच्या धर्म, रंग, जात आणि राष्ट्रीयत्वाशी काहीच संबंध नसतो. ज्यांना हे समजत नाही, त्यांच्यासाठी स्टेडियममध्ये जागा नाही, असे ट्विट करत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याने प्रतिक्रिया दिली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj) वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्याने थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनेही ( Ajinkya Rahane) आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. या प्रकरणावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) याने नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

वर्णद्वेषी शेरेबाजाची ICC कडून दखल; अहवाल मागवला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील घटनेचा समांतर तपास करणार आहे. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेन (आयसीसी) नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल आयसीसीन मागवला आहे. या घटनेबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने माफी मागितली. त्यानंतर आता आयसीसीनं घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सिडनीमधील क्रिकेट मैदानात झालेल्या वर्णद्वेषी शेरेबाजाची निंदा करते. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या प्रकरणाच्या तपासासाठी योग्य सहकार्य करावं,’ अशा सूचना आयसीसीकडून देण्यात आल्या आहेत.