भारताचा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय ! ऑस्ट्रेलिया -भारत पहिला डे नाईट कसोटी सामना सुरु

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दिवस -रात्र कसोटी सामन्याला प्रारंभ होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय डावाची सुरुवात केली आहे.
टीम इंडिया तब्बल १० महिन्यांनंतर कसोटी सामना तोही डे -नाईट सामना खेळत आहे. त्यामुळे टीम इंडियासमोरचे आव्हान खडतर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने अव्वल स्थान गमावले आहे. कसोटी अंजिक्यपदाच्या स्पर्धेत भारताची पहिल्या क्रमांकावरुन तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे.

प्रकाशझोतात खेळणे हे आव्हानात्मक असते. ऑस्ट्रेलियीन संघाला भारतापेक्षा असे कसोटी सामने खेळण्याचा अधिक अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाने असे ७ सामने खेळले असून त्यातील एकही सामना गमावलेला नाही़ भारताने अवघा एक सामना खेळला आहे.
भारताने पृथ्वी शॉला संधी दिली असून दोन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरच असताना सराव सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला शॉ त्यानंतर प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे.

भारतीय संघाने रिषभ पंतऐवजी वृद्धिमान साहा याच्यावर अधिक विश्वास दाखवत त्याचा संघात समावेश केला आहे.अ‍ॅडलेट येथील मैदान ऑस्ट्रेलियाला नेहमीच लकी राहिले आहे. गेल्या पाचही कसोटीत ऑस्ट्रेलियाने येथे विजय मिळविला आहे. तर, भारताला गेल्या २ कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. अ‍ॅडलेटमधील एकही कसोटी पाचव्या दिवसांपर्यंत चालला नाही. त्यामुळे याही सामन्याचा निर्णय निश्चित आहे. फक्त तो कोणाच्या बाजूने असेल हे पुढच्या दोन दिवसात समजेल.