‘ते’ केवळ ट्रॉफीचेच हकदार नाहीत : गावसकर

मेलबर्न : वृत्तसंस्था – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत २-१ असे पराभूत केले. मालिका विजयनानंतर आयोजकांनी विजेत्या संघाला केवळ ट्रॉफी सुपूर्द केली, पण त्याबरोबर कोणत्याही प्रकारचे रोख इनाम किंवा धनादेश दिला नाही, याबद्दल गावसकर यांना नाराजी व्यक्त केली.
सामना संपल्यानंतर सामनावीर युझवेन्द्र चहल आणि मालिकावीर महेंद्रसिंग धोनी या दोघांना बक्षीस म्हणून केवळ प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३५ हजार रुपयांचे इनाम देण्यात आले. ही रक्कम या दोघांनाही दान केली. तसेच विजेत्या संघाला ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट याने केवळ ट्रॉफी सुपूर्द केली. यावर गावसकर प्रचंड भडकले.
सामनावीर आणि मालिकावीर यांना लाभलेली ५०० डॉलर्स रक्कमच अल्पच आहे.  कहर म्हणजे त्यांनी विजेत्या भारतीय संघाला फक्त ट्रॉफीच दिली. तीन मालिकांच्या प्रक्षेपणाची घसघशीत रक्कम ऑस्ट्रेलियाला प्रायोजकांकडून मिळाली आहे. त्यातील पैसे विजेत्या खेळाडूंना दिले असते तर काय झाले असते? शेवटी हा पैसा, प्रसिद्धी खेळाडूंमुळेच तर लाभते…’, अशा शब्दांत गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर टीकास्त्र सोडले.
या दौऱ्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आयोजकांनी या मालिकेतून प्रयोजकांच्यामार्फत खूप उत्पन्न मिळवले असणार. मग हे उत्पन्न त्यांनी ज्या खेळाडूंच्या जीवावर मिळवले आहे, त्या खेळाडूंना त्या उत्पन्नाचा वाटा द्यायला नको का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मालिकावीर आणि सामनावीर या दोघांना केवळ ३५ हजार रुपयांचे इनाम देणे म्हणजे अत्यंत कीव करण्याची बाब आहे, अशी टीकाही गावसकर यांनी केली.
आपला राग व्यक्त करताना गावस्कर यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे उदाहरण दिले. ‘विम्बल्डन टेनिस स्पर्धेत बघा… खेळाडूंना भरघोस रकमेची बक्षिसे दिली जातात. खेळात पैसा येतो तो खेळाडूंच्या कामगिरीमुळेच. तेव्हा त्यांच्या गुणांचा गौरव करताना यातील थोडी रक्कम द्यायला हवीच’, असे गावस्कर म्हणाले. २०१८मध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गारद होणाऱ्या खेळाडूलाही ३६ लाख रुपयांचे मानधन लाभले होते. तर एकेरीतील विजेत्या खेळाडूला २१ कोटी रुपयांचे बक्षिस लाभले.