भारतीय संघ अडचणीत, रविंद्र जाडेजाला दुखापत, चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सिडनीच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाला दुखापत झाली आहे. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता आता मावळली आहे. जाडेजाचे संघाबाहेर जाणे भारतासाठी एक झटका आहे. कारण या दौऱ्यात तो प्रचंड फॉर्ममध्ये आहे. बॅट आणि चेंडूनेही त्याने कमाल दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे शॉर्ट चेंडू खेळताना जाडेजाला ही दुखापत झाली. लगेच त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग केले आहे. जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे. ग्लोव्हज घालून फलंदाजी करणे त्याच्यासाठी खूप कठिण असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितले. पुढचे दोन ते तीन आठवडे तो खेळू शकणार नाही. त्यामुळे अंतिम कसोटी सामन्यात त्याच्या समावेशाची शक्यता आता धूसूर झाली आहे.

जाडेजाच्या 28 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 100 पेक्षा कमी धावांची आघाडी मिळाली. मिचेल स्टार्कच्या शॉर्ट चेंडू त्याच्या डाव्या अंगठ्यावर बसला. त्याला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज लागली. जाडेजा या दौऱ्यात प्रचंड फॉर्ममध्ये आहे. बॅट आणि चेंडूनेही त्याने कमाल दाखवली आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात चार विकेट घेऊन त्याने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते.