लयभारी ! रोहितनं घेतला ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचा अफलातून झेल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात एकूण तीन झेल घेतले. पहिल्या दिवशी दोन आणि दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एक, असे तीन झेल रोहित शर्मानं घेतले आहेत. रोहित शर्माची सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला तो पहिल्या दिवशी घेतलेल्या वॉर्नरच्या भन्नाट झेलमुळे. दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात घेतलेल्या झेलमुळेही रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण करत असताना कांगारुंना अनेकवेळा संधी दिली. मात्र, ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं आपल्या क्षेत्ररक्षणानं सर्वांना प्रभावित केलं आहे. दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार टिम पेन यानं तुफानी फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पेन यानं कर्णधाराला साजेशी खेळी करताना अर्धशतकही झळकावलं. मात्र, शार्दुल ठाकूनरनं टाकलेल्या चेंडूवर रोहित शर्मानं सुरेख झेल घेत पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.

पेन-ग्रीनची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना शार्दूलने भारतीय संघाला मोठा ब्रेक मिळवून दिला. शार्दुलनं फेकलेला चेंडू पेनच्या बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माच्या हातात स्थिरावला. कर्णधार टिम पेन याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं तिनशे धावांचा टप्पा पार केला. पेन आणि कॅमरुन ग्रीन यांच्यामध्ये सहाव्या गड्यासाठी ९८ धावांची महत्वाची भागिदारी झाली. मराठमोळा शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर आणि टी. नटराजन यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आला.