… अन् त्यानं खरंच काढली अर्धी मिशी, रोहित शर्मावरून लावली होती पैज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोण पैशाची पैज लावतो तर कोण एखादी वस्तू अथवा अन्य काही. त्यात क्रिकेटवर पैज लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनी येथे सुरु आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माचं (Rohit Sharma) भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. रोहितच्या कसोटीतील प्रतिभावरुन आणि खेळण्यावरुन अर्धी मिशी काढेन अशी एका व्यक्तीनं पैज लावली होती. पैज हरल्यामुळे त्या व्यक्तीनं खरोखरचं आपली अर्धी मिशी काढली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्या व्यक्तीची जोरजार चर्चा सुरु आहे. अर्ध्या मिशीसह त्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवरील या व्यक्तीचं नाव अजय असल्याचं समजतेय.

भूषण कदम या क्रीडा चाहत्यानं आपल्या ट्विटवर सिडनी कसोटी सामन्याआधी रोहित शर्माच्या समावेशाबाबत प्रश्न विचारला होता. रोहित शर्माला तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यासाठी कोणाला डच्चू देण्यात यावा? असा प्रश्न विचाराला होता. या प्रश्नावर @Ajay81592669 या युजरने ‘रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम पुरुष आहे. ब्रॉड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो,’ असं म्हटलं होतं.

सिडनी कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात रोहित शर्मानं ७७ चेंडूचा सामना करताना २६ धावांची खेळी केली. रोहित शर्माच्या या खेळीनंतर काही नेटकऱ्यांनी अजयला ट्रोल करण्यासाठी त्याच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. अजयनेही कोणताही विचार करता आपला शब्द पाळला. त्यांनी खरेच आपली अर्धी मिशी काढली. अर्ध्या मिशीवरील फोटो अजयनं आपल्या ट्विटवर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, आभासी जगात लावली शर्यत होती. तुम्ही कशाला अर्धी मिशी काढायची, असे काही जणांनी अजयला म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजय म्हणाला की, ‘बऱ्याच जणांनी मी अर्धी मिशी काढल्याबद्दल नावं ठेवली. पण मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान होता आणि आहे. तरीदेखील मी सिडनी डोळ्यासमोर असताना पैज लावण्याची चूक केली. म्हणून खूप विचारांतीच मी अर्धश्मश्रूमुंडन केलं आहे.