विराटनं मोडला सचिनचा विक्रम; एकदिवसीय सामन्यांमध्ये केल्या 12 हजार धावा पुर्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वन डे मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघाला या तिसऱ्या सामन्यात इभ्रत वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अखेर कर्णधार विराट कोहलीच्या बाजूने पडला आणि त्यानं त्वरित प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यात कोहलीने फलंदाजी करताना एक नवा विक्रम नोंदवला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत जलद १२ हजार धावांचा विक्रम विराटनं नावावर करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटनं २५१ व्या वन डे सामन्यात १२ हजार धावा पूर्ण केल्या.

मालिकेतील दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर टीम इंडियावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. अखेर अंतिम सामन्यात भारतीय संघात चार बदल करण्यात आले. मयांक अग्रवालला विश्रांती दिल्यानं शिखर धवनसह सलामीला शुबमन गिल आला. टी नटराजननं वन डे संघात पदार्पण केले, तर शार्दूल ठाकूर व कुलदीप यादव यांनीही अंतिम अकरामध्ये स्थान पटकावले. नवदीप सैनी, मोहम्मद शमी, मयांक आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे.

धवन व गिल जोडीला पहिल्या विकेटसाठी २६ धावाच करता आल्या. सीन अबोटनं सहाव्या षटकात धवनला ( १६) सहज बाद केले. कव्हरला उभ्या असलेल्या अश्टन अगरनं सोपा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या विराटनं २३वी धाव घेताना विक्रमाला गवसणी घालत १२ हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी विराटच्या नावावर २५० सामन्यांत ११, ९७७ धावा होत्या. त्यानं या मालिकेतील पहिल्या दोन वन डे सामन्यात अनुक्रमे २१ व ८९ धावा केल्या होत्या.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान १२ हजार धावा करणारे फलंदाज

वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत जलद १२ हजार धावांचा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिननं ३०९ वन डेत ३०० डावांमध्ये हा पल्ला पार केला होता. कोहलीनं ५८ सामन्यांपूर्वी हा पल्ला पार केला असून, वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान १२ हजार धावा करणारे फलंदाज पुढीलप्रमाणे :
विराट कोहली ( २५१ सामने व २४२ डाव), सचिन तेंडुलकर ( ३०९ सामने व ३०० डाव), रिकी पाँटिंग ( ३२३ सामने व ३१४ डाव ), कुमार संगकारा ( ३५९ सामने व ३३६ डाव), सनथ जयसूर्या ( ३९० सामने व ३७९ डाव), महेला जयवर्धने ( ४२६ सामने व ३९९ डाव)