IND Vs ENG : पुण्यातील वन डे सामन्यावरील संकट टळलं, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात कसोटी, वन डे आणि टी – 20 सामने खेळणार आहे. यापैकी तीन वन डे सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. परंतु पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने हे सामने महाराष्ट्रात घ्यायचे की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. अखेर या सामन्यावरील संकट दूर झाले आहे. मात्र, हे सामने खेळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी अट घातली आहे.

महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन लावायचा की नाही यावर चर्चा सुरु असतानाच क्रिकेट सामन्यांच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण झाला होता. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि इंग्लंड यांच्यातील वन डे आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात खेळवण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेट सामन्यांना परवानगी दिली असली तरी मोठी अट घातली आहे. पुण्यात होणारे हे तीनही क्रिकेट सामने विना प्रेक्षक खेळवले जातील. कोरोनाचे सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत. यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सशर्त परवानगीनंतर तीन वन डे सामन्यावरील संकट टळलं असलं तरी क्रिकेट प्रेमींची निराशा झाली आहे.