IND vs ENG : विराटची मोठी घोषणा ! ‘हे’ सलामीवीर करणार टीम इंडियाच्या डावाची सुरुवात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   येत्या २३ मार्च रोजी भारत आणि इंग्लंड मधील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताने या अगोदर कसोटी आणि टी- २० मध्ये इंग्लंडवर विजय मिळवला आहे. वनडे मालिकेला सुरुवात होण्याच्या अगोदर भारताचा कर्णधार विराट कोहली याने भारताच्या सलामीच्या जोडीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. भारताच्या इंनिंगची सुरुवात शिखर धवन आणि रोहित शर्मा हे दोघे सलामीवीर करतील अशी माहिती विराट कोहलीकडून देण्यात आली आहे.

टीम इंडिया ३ महिन्यांनंतर वनडे मालिका खेळणार आहे. या अगोदर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका खेळली होती. या मालिकेत भारताचा २- १ ने पराभव झाला होता. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे या मालिकेची सुरुवात केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली होती.

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली याने रोहित शर्मा आणि शिखर धवन भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करतील असे स्पष्ट केले आहे तसेच सूर्यकुमार यादव याला संघात सामील करुन घेण्याबाबत अजून विचार केला जात आहे असे सांगितले आहे. “मैदानात कोणत्या कॉम्बिनेशननं उतरावं यात जशी निवड समितीची कोणतीही भूमिका नसते. त्याच पद्धतीनं संघ निवडीच्याबाबतीत संघ व्यवस्थापनाचा कोणताही सहभाग नसतो. कुणी कोणत्या स्थानावर फलंदाजीला उतरावं हे परिस्थिती पाहून ठरवलं जातं”, असे देखील कोहली याने सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी – २० मालिकेत भारताच्या सलामीच्या जोडीमध्ये ४ वेळा बदल झाल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि केएल राहुल तर दुसऱ्या सामन्यात केएल राहुल आणि इशान किशन यांनी डावाची सुरुवात केली होती. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली. तर पाचव्या सामन्यात रोहित शर्मा बरोबर स्वतः कर्णधार विराट कोहली याने सलामीला फलंदाजी करत डावाची सुरुवात केली होती.