टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 3-1 ने पराभव करून जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर आता भारतीय संघाची नजर टी-20 मालिकेवर आहे. येत्या 12 मार्चपासून 5 सामन्यांची टी 20 सीरीज सुरु होणार आहे. या मालिकेचे सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. यावर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप पाहता भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यान आतापर्यंत 14 टी -20 सामने (2007-2018) खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 7 तर इंग्लंडनेही तितकेच सामने जिंकले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या 5 टी -20 सामन्यात भारताने 4 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरच्या वेळी भारताने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी -20 मालिका खेळली होती. जी भारताने 2-1ने जिंकली होती.

मँचेस्टर येथे झालेल्या पहिल्या टी – 20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. कार्डिफमधील दुसरा टी – 20 सामना इंग्लंडने 5 विकेट्सने जिंकून मालिकेत वापसी केली होती. ब्रिस्टॉलमध्ये खेळल्या गेलेल्या अखेरच्या टी – 20 सामन्यात भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने हरवून मालिका जिंकली. तिसर्‍या सामन्यात सामनावीर रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी केली.

2017 मधील तीन सामन्यांच्या देशांतर्गत टी – 20 मालिका देखील भारताने 2-1 ने जिंकली. कानपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताचा 7 विकेटने पराभव झाला. यानंतर नागुपर टी -20 मध्ये भारताने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली. बंगळुरुमधील शेवटचा सामना भारताने 75 धावांनी जिंकला. शेवटच्या सामन्यात सामनावीर म्हणून युझवेंद्र चहलने सहा विकेट्स घेतल्या.

सध्याच्या टी -20 मालिकेसाठी 19 सदस्यीय भारतीय संघात काही नवीन चेहर-यांना़ संधी मिळाली. ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि राहुल तेवतिया यांचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे.

टी – 20 मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत ( विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.