IND Vs ENG : कसोटी मालिका वाचवायची असेल तर ‘या’ खेळाडूचं पदार्पण होऊ द्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागाला. भारतीय संघावर तब्बल 22 वर्षांनंतर नामुष्की ओढवल्याचं पहायला मिळालं. गेल्या 22 वर्षात चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात भारतीय संघाला एकही पराभव पत्करावा लगाला नव्हता. परंतु चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघाला 22 वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर आता टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याच्यावरील दबाव वाढला आहे. यानंतर आता दुसऱ्या कसोटीचं महत्त्व वाढलं आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी इंग्लंड विरुद्धची कसोटी वाचवायची असेल तर भारतीय संघात फिरकीपटू यजुवेंद्र चहल याला संधी द्यावी असा सल्ला भारतीय संघाला आदिला आहे.

काय म्हणाले आकाश चोप्रा ?
आकाश यांनी ट्विट करत लिहिलं की, भारतीय संघात आता यजुवेंद्र चहल याच्या कसोटी पदार्पणासाठी प्रयत्न करायला पाहिजे असा थोडासा हटके विचार आणि सल्ला आहे. कारण बायो-बबलच्या प्रोटोकॉलमुळं त्याला संघाशी जुळवून घेण्यात थोडा वेळ जाई. अशात त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे की, पहिल्या कसोटीतील संघ निवडीत कोणतीही चूक नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा याबाबत विचार केला जाईल. त्यामुळं आता भारतीय संघात बदल केले जाण्याचे संकेत आहेत. यात नेमकं कोणत्या खेळाडूंना संघाच्या बाहेराच रस्ता दाखवला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.