टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय 

नेपियर : वृत्तसंस्था – टीम इंडियाने विजयाची परंपरा कायम राखली आहे. गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे व फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वन-डे सामन्यात ८ विकेट राखून विजय मिळवला. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीला रोहित शर्मा व विराट कोहली यांची मिळालेली साथ यामुळे भारताने १५६ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कर्णधार केन विल्यमसनने ८१ चेंडूत ७ चौकारांसह ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही. मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडला १५७ धावांवर रोखलं.

मधल्या काही षटकांदरम्यान प्रखर सुर्यप्रकाराशामुळे सामना थांबवण्यात आला होता. यामुळे सामन्यातलं एक षटक कमी करुन भारताला विजयासाठी दिलेल्या आव्हानात एक धाव कमी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सूर्याच्या किरणांनी खेळ थांबवल्याची ही दुसरी घटना होती. शिखर धवनने अर्धशतकही झळकावलं, त्याने ७५  धावा केल्या. विराट कोहलीनेही त्याला उत्तम साथ दिली, मात्र सामना जिंकायला अवघ्या काही धावा शिल्लक असताना तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याचं अर्धशतक ५ धावांनी हुकलं. या मालिकेतला दुसरा सामना २६ जानेवारी रोजी होणार आहे.